Mutual Fund : गेल्या दीड महिन्यांपासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. सापशिडीचा खेळ म्हटला तरी चालेल. कारण, एक दिवशी बाजार वर जातो, तर दुसऱ्याच दिवशी आपटतो, अशी परिस्थिती आहे. यामुळे गुंतवणूकदारांना वारंवार त्यांची रणनीती बदलण्यास भाग पडत आहे. यामुळे गुंतवणूकदार आता हायब्रीड फंडांकडे वळू लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये या योजनेत ४,१२९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या योजनेच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढले आहे. यावरुन याची लोकप्रियता लक्षात येऊ शकते.
हायब्रीड फंड म्हणजे काय?हायब्रीड फंड ही म्युच्युअल फंडाची योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवले जातात. जोखीम आणि परतावा यांच्यातील समतोल साधणे हा हायब्रीड फंडांचा उद्देश आहे. हायब्रिड फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत करतो, ज्यामुळे बाजारातील जोखीम कमी होते. हायब्रीड फंडात शेअर बाजार घसरला तर सोने आणि डेटकडून सकारात्मक परतावा मिळतो. त्यामुळे या विभागातील फंडांमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढला आहे.
गुंतवणूक वेगाने वाढलीअसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (Amfi) मते, हायब्रीड फंडांची AUM एका वर्षात ६.०२ लाख कोटी रुपयांवरून ८.७७ लाख कोटी रुपये झाली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये हायब्रीड फंड ही सर्वात वेगाने वाढणारी श्रेणी झाली आहे. कारण, गुंतवणूकदार बाजारातील अस्थिर परिस्थितीत स्थैर्य शोधतात. हायब्रीड फंड इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये गुंतवणूक करत असल्याने त्यांना पसंती मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना कमी जोखीम आणि चांगला परतावा मिळतो.
२३ लाख नवीन गुंतवणूकदारया वर्षी ऑक्टोबरमध्ये हायब्रीड फंडांमध्ये २३ लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन म्युच्युअल फंड हायब्रीड फंडांवर भर देत आहेत. बहुतेक फंड हाउसेस कर्ज आणि इक्विटीची एकत्रित ऑफर देत आहेत. यात निप्पॉन इंडिया मल्टी एसेट फंड वेगळा आहे. हा फंड इक्विटी, डेट आणि कमोडिटीमध्ये निश्चित गुंतवणूकीचे पालन करतो. याची आंतरराष्ट्रीय शेअर्समध्येही गुंतवणूक आहे. निप्पॉन इंडिया इक्विटी हायब्रिड फंडाने २३.०२ टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाने एका वर्षात १९.३९ टक्के परतावा दिला. तर त्याच्या बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाने १९.३९ टक्के नफा दिला आहे.
या फंडांमध्ये चांगला परतावा निप्पॉनप्रमाणे एका वर्षात HDFC मल्टी एसेटने १८.९ टक्के परतावा दिला आहे, कोटक मल्टी एसेटने २३.५ टक्के परतावा दिला आहे. तर निप्पॉन मल्टी एसेटने २५.९३ टक्के परतावा दिला आहे. अस्थिर बाजारपेठांमध्ये, हायब्रिड फंड पैशांची सुरक्षा आणि वाढ दोन्ही देतो. हे फंड बाजारातील बदलांशी जुळवून घेत असल्याने गुंतवणूकदारांना अस्थिर बाजाराची चिंता सतावत नाही.
सूचना : यात म्युच्युअल फंडाची माहिती देण्यात आलेली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.