Join us
Daily Top 2Weekly Top 5

STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:32 IST

Mutual Fund Sip Vs STp : सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅन ही एक स्मार्ट गुंतवणूक पद्धत आहे. त्यामध्ये एका म्युच्युअल फंडातून दुसऱ्या म्युच्युअल फंडात हळूहळू पैसे ट्रान्सफर केले जातात.

Mutual Fund Sip Vs STp : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सर्वात लोकप्रिय आहे. पण आता अनेक गुंतवणूकदार एसआयपीपेक्षा अधिक 'स्मार्ट' असलेल्या एका पर्यायाकडे वळत आहेत, तो म्हणजे एसटीपी अर्थात सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. एसआयपीमध्ये आपण थेट दरमहा बाजारात पैसे गुंतवतो, तर एसटीपीची पद्धत वेगळी आहे. यात आपले पैसे आधी एका सुरक्षित फंडात जातात आणि नंतर हळूहळू दुसऱ्या फंडात हस्तांतरित होतात.

काय आहे एसटीपी ?एसटीपी म्हणजे 'व्यवस्थित हस्तांतरण योजना'. जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराकडे एक मोठी रक्कम (उदा. ₹१,००,०००) एकरकमी गुंतवण्यासाठी असते, तेव्हा ती रक्कम थेट बाजारात न गुंतवता, प्रथम ती रक्कम डेट फंड किंवा लिक्विड फंड सारख्या सुरक्षित फंडात ठेवली जाते. त्यानंतर, ठरलेल्या वेळेनुसार (उदा. दरमहा) त्या डेट फंडातून एक निश्चित रक्कम (उदा. ₹१०,०००) दुसऱ्या फंडात, जो बहुतांशी इक्विटी फंड असतो, ट्रान्सफर केली जाते.

यामुळे फायदा हा होतो की, एकाच वेळी बाजारात मोठी रक्कम जात नाही. परिणामी, बाजारातील मोठ्या चढ-उतारांचे आणि एकूणच गुंतवणुकीतील जोखमीचे व्यवस्थापन हळूहळू करणे शक्य होते.

एसटीपीचे फायदे

  • बाजार कोसळल्यास किंवा मोठे चढ-उतार झाल्यास तुमचे संपूर्ण पैसे एकाच वेळी गुंतलेले नसल्यामुळे, नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
  • तुमचा पैसा डेट फंडात ठेवलेला असल्याने, एफडी किंवा बचत खात्यापेक्षा जास्त व्याज/परतावा मिळण्याची शक्यता असते.
  • दर महिन्याला वेगवेगळ्या 'एनएव्ही' वर खरेदी होत असल्यामुळे, युनिट्सची सरासरी किंमत चांगली होते.
  • या पद्धतीमुळे नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते.

एसटीपीचे तोटे

  • खूप कमी वेळेसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना याचा फारसा फायदा होत नाही.
  • जर तुम्ही चुकीचा फंड निवडला आणि बाजाराचे वातावरण बिघडले, तर परतावा कमी होऊ शकतो.
  • कमी कालावधीत पैसे ट्रान्सफर केल्यास, विशेषत: डेट फंडातून पैसे काढताना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होऊ शकतो.
  • प्रत्येक फंड हाऊस किंवा प्रत्येक स्कीममध्ये एसटीपीची सुविधा उपलब्ध नसते.

वाचा - रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ

एसटीपी कुणासाठी आहे योग्य?एसटीपी त्यांच्यासाठी सर्वात चांगली आहे, ज्यांच्याकडे एक मोठी रक्कम एकरकमी उपलब्ध आहे आणि ज्यांना ही रक्कम बाजारात गुंतवताना जोखीम व्यवस्थापित करायची आहे.जी लोक बाजाराची चाल आणि अस्थिरता पाहून हळूहळू पैसे गुंतवू इच्छितात, त्यांच्यासाठी एसटीपी हा एक उत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : STP vs SIP: Differences, Advantages, Disadvantages, and Who Should Invest?

Web Summary : STP offers a safer approach than SIP by initially investing in secure funds. Funds are gradually transferred to equity, managing market volatility. STP suits investors with lump sums seeking risk mitigation, offering potential for higher returns than fixed deposits.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी