Join us

शेअर बाजारात सातत्याने घसरण! म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले पैसेही बुडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:24 IST

Mutual Funds : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. याचा परिणाम आता म्युच्युअल फंडांवर दिसत असून पोर्टफॉलिओ लाल रंगात गेले आहेत.

Mutual Funds : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची अवस्था सध्या इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी शेअर मार्केटचा धोका नको म्हणून एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. मात्र, आता शेअर बाजारातील प्रचंड घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवरही दिसू लागला आहे. बाजारातील सातत्याच्या घसरणीमुळे म्युच्युअल फंडात गेल्या ३ महिन्यांत सुमारे १० ते १५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक करून लाभ मिळवणाऱ्यांचा पोर्टफोलिओ आता लाल रंगात बदलला आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बुडतील का?शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणूक धोरण आहे. तुम्ही तुमची एसआयपी किमान ५ वर्षे जरी कायम ठेवली तरी तोटा जाऊन चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजार घसरला आहे. मात्र, याच घसरणीत एसआयपीच्या माध्यमातून तुमचे पैसे लागले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात शेअर बाजार थोडा जरी वाढला तरी तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा हिरवा होईल. दीर्घकालीन धोरण असलेल्या गुंतवणूकदारांना पैसे बुडण्याचा धोका नाहीच्या बरोबर आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना संयम आवश्यकशेअर बाजारातील घसरण ही काही नवीन बाब नाही. यापूर्वीही अशा प्रकारे घसरण पाहायला मिळाली होती. कोरोना काळात तर शेअर मार्केट सर्वात जास्त कोसळलं होतं. बाजारातील सध्याच्या परिस्थितीत संयम राखणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे की जर तुम्ही SIP द्वारे नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमची गुंतवणूक चालू ठेवावी. तुम्ही आज संयम ठेवला तर उद्या त्याचा चांगला फायदा तुम्हालाच मिळणार आहे.

भारतीय शेअर बाजार का घसरतोय?भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमागे अनेक मोठी कारणे आहेत. याचे पहिले कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदार देशाच्या बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेत आहेत. डिसेंबर २०२४ तिमाहीचे निकाल अपेक्षित नसल्याने गुंतवणूकदार निराश झालेत. याशिवाय निफ्टी आणि सेन्सेक्स काही काळापासून घसरणीचा सामना करत आहेत. भू-राजकीय परिस्थितीमुळए जागतिक आर्थिक अनिश्चितता निर्माण झालीय. अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि ट्रम्पच्या टॅरिफ धमकीचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम होत आहे. याशिवाय चलनवाढ आणि घसरणारा विकास दरही बाजाराच्या स्थिरतेला आव्हान देत आहेत.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी