Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स-निफ्टी १० वर्षांच्या सरासरीच्या खाली; गुंतवणूक करण्याची हीच का योग्य वेळ? तज्ज्ञांचा काय सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:44 IST

Lumpsum Investment: शेअर बाजारातील अलीकडील घसरणीमुळे गुंतवणूकदार निश्चितच हादरून गेले आहेत; तरीही, बाजारातील अनुभवी जाणकारांचे असे मानणे आहे की, सेन्सेक्स आणि निफ्टी आता गेल्या एका दशकातील त्यांच्या सर्वात स्वस्त पातळीवर पोहोचले आहेत.

Lumpsum vs SIP : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेने आणि अलीकडच्या 'करेक्शन'ने सामान्य गुंतवणूकदारांना संभ्रमात टाकले होते. मात्र, बाजार विश्लेषकांच्या मते, ही घसरण म्हणजे धोका नसून गुंतवणुकीची एक उत्तम संधी आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे जे गुंतवणूकदार आतापर्यंत बाजारापासून दूर होते, त्यांच्यासाठी आता 'व्हॅल्यूएशन' रास्त स्तरावर आले असून, एकरकमी गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक झाले आहे.

ऐतिहासिक सरासरीच्या खाली 'व्हॅल्यूएशन'

  • आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे एमडी आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यम यांच्या मते, गेल्या दोन-अडीच वर्षांत बाजारात 'टाइम करेक्शन' झाले आहे. याचा अर्थ असा की, भाव फारसे वाढले नसले तरी कंपन्यांचा नफा वाढल्याने त्यांचे मूल्यांकन आता आवाक्यात आले आहे.
  • सध्या सेन्सेक्स आणि निफ्टीचा 'वन-इयर फॉरवर्ड पीई' सुमारे १७.८ पट आहे. एप्रिल २०२३ नंतरचा हा सर्वात खालचा स्तर आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे, निफ्टी आणि सेन्सेक्स सध्या त्यांच्या गेल्या १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत खाली व्यवहार करत आहेत. त्यामुळे बाजार आता तळ गाठण्याच्या स्थितीत असून मोठ्या घसरणीची शक्यता धूसर आहे.

एकरकमी गुंतवणुकीसाठी 'लार्ज-कॅप'ला पसंती

  • सॅमको सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, मायक्रोकॅप विभागातील सुमारे ३१% शेअर्स त्यांच्या 'प्राईस-टू-बुक' मल्टिपलच्या नीचांकी पातळीवर आहेत. मात्र, 'शेअर.मार्केट'चे गुंतवणूक प्रमुख नीलेश डी. नायक यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
  • मिड आणि स्मॉल-कॅप येथे अजूनही काही ठिकाणी व्हॅल्यूएशन चढे असल्याने सावध राहावे.
  • ३ ते ५ वर्षांचा दृष्टिकोन असलेल्या गुंतवणूकदारांनी फ्लेक्सी-कॅप, मल्टी-कॅप आणि लार्ज-कॅप फंडांना प्राधान्य द्यावे.

जोखीम टाळण्यासाठी 'बॅलन्स्ड' धोरण

  • बाजार आकर्षक स्तरावर असला तरी, जागतिक भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती यामुळे अस्थिरता कायम राहू शकते. अशा वेळी 'वाइस फिनसर्व्ह'चे सीईओ अजय कुमार यादव यांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
  • आपली सर्व गुंतवणूक एकदम न लावता, काही हिस्सा आता गुंतवावा आणि उर्वरित रक्कम पुढील ३-६ महिन्यांत 'सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन'द्वारे गुंतवावी.
  • ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे, त्यांच्यासाठी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड्स हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

वाचा - कतारचा गॅस 'होर्मुज'मध्ये अडकला! भारतासमोर कोणते पर्याय? तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडणार?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Sensex, Nifty Below Average: Right Time to Invest? Experts Advise.

Web Summary : Market correction offers investment opportunity. Experts suggest staggered investment via STP, favoring large-cap, balanced funds to mitigate risk amid global uncertainties. Value is attractive now.
टॅग्स :शेअर बाजारअमेरिका-इस्रायल-इराण वॉरस्टॉक मार्केटम्युच्युअल फंडगुंतवणूक