Join us

भरघोस परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? 'हे' ३ फॅक्टर महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:12 IST

mutual fund : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे बुडण्याची भिती वाटत असेल. पण, परतावा जास्त हवा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

mutual fund : कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेकजण यातून मालामाल झाले. मात्र, इथं नवख्या व्यक्तींचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची उदाहरणेही कमी नाहीत. तुम्हालाही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची इच्छा आहे. मात्र, जोखीम घेण्यास मन तयार नाही. अशा वेळी म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत म्युच्युअल फंडांतील जोखमी खूप कमी होते. पण, सध्या बाजारात असंख्य म्युच्युअल फंडा आहेत. अशावेळी आपल्यासाठी योग्य कोणता? रिटर्न्स कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये जास्त मिळतील? असे प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. हा संभ्रम दूर होणे आवश्यक असते. हा संभ्रम दूर करण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

म्युच्युअल फंडचे प्रकार आणि उद्देश जाणून घ्या म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी आणि डेट, असे दोन प्रकार आहेत. इक्विटी प्रकारातील गुंतवणूक थेट शेअर बाजारात जाते. डेट प्रकारातील गुंतवणूक रोख्यांमध्ये गुंतवली जाते. इक्विटीमध्ये रिस्क फॅक्टर जास्त, तर डेटमध्ये रिस्क कमी असते. परतावा इक्विटीमध्ये जास्त मिळतो. आता ज्यांना रिस्क कमी, परंतु कमी का असेना हमखास परतावा हवा त्यांनी हायब्रीड किंवा बॅलन्स या प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये रक्कम गुंतवावी. यातील रक्कम इक्विटी व डेट या दोन्ही प्रकारांत विभाजन करून गुंतवली जाते. जर आपल्याकडे दीर्घ काळ उदा. दहा, पंधरा किंवा त्याहूनही जास्त काळ असेल, तर गुंतवणूकदारांनी इक्विटी या प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये रक्कम गुंतविण्यास प्राधान्य द्यावे, परंतु कालावधी कमी असेल, तर मात्र बॅलन्स फंडमध्ये गुंतवणूक करावी.

गुंतवणुकीचा कालावधी 

दीर्घ कालावधीसाठी पूर्ण रक्कम इक्विटीमध्ये गुंतवायची असल्यास लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारांतील म्युच्युअल फंडमध्ये विभागून गुंतवावी. याचे कारण शेअर बाजार हा अत्यंत संवेदनशील असतो. सेक्टर निहाय खाली-वर होत असतो. यामुळे प्रत्येक कॅपमधील परतावा हा वेळोवेळी कमी जास्त होत राहतो. यामुळे रिस्क सम प्रमाणात विभागली जाते.  म्युच्युअल फंडमध्ये मल्टी कॅप हा एक प्रकार अत्यंत सोयीचा ठरू शकतो. यात गुंतवलेली रक्कम विविध कॅपमध्ये जाते. फंड मॅनेजर योग्य वेळी गुंतवलेली रक्कम लार्ज कॅपमधून मिड किंवा स्मॉल कॅपमध्ये वळवू शकतात. 

फंड मॅनेजर तज्ज्ञ मार्केटमधील हालचालींवर योग्य लक्ष ठेऊन असतात. गुंतवणूकदारांचे हीत लक्षात घेऊन वेळोवेळी योग्य निर्णय घेत असतात. यातच मल्टी असेट म्युच्युअल फंड हा प्रकारही आपली गुंतवणूक आणि त्यातील रिटर्न्स बॅलन्स ठेवण्यास मदत करते. यात इक्विटी, डेट आणि मेटल (सोने/चांदी) या तिन्ही प्रकारांत रक्कम विभागून गुंतवली जाते. गुंतवणूकदारांनी त्यांचे वय आणि त्यांच्याकडील गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेता योग्य म्युच्युअल फंडची निवड करावी.

(Disclaimer- यामध्ये म्युच्युअल फंडाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक