mutual funds : २०२४ या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. म्हणजे कोणी १ लाख गुंतवले असतील तर त्याचे आता २ लाख रुपये झालेत. मात्र, म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक गुंतवणूकदार एक चूक करतात. विविध फंडांनी गेल्या काही वर्षात किती परतावा दिला? हे पाहून गुंतवणूक करतात. यातील फार कमी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्या खर्चाचे प्रमाण (एक्सपेन्स रेशो) पाहतात. तुम्हीही असे करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की याचा थेट परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावर होत असतो.
खर्चाचे प्रमाण म्हणजे काय?तुमचे पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक म्युच्युअल फंड तुमच्यावर विशिष्ट शुल्क आकारतो. यालाच खर्चाचे प्रमाण म्हणतात. हे शुल्क जास्त असेल तर तुम्हाला परतावा कमी मिळणार आणि कमी असेल तर परतावा जास्त मिळणार इतकं सोपं गणित आहेत. हे शुल्क व्यवस्थापन, प्रशासकीय आणि विविध खर्चांसाठी गुंतवणूकदारांकडून आकारले जाते.
परताव्यावर कसा परिणाम होतो? तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावर एक्सपेन्स रेशोचा थेट परिणाम होतो. उच्च खर्चाचे प्रमाण तुम्हाला मिळणारे निव्वळ परतावा कमी करते, याचा अर्थ फंडाच्या कमाईचा एक महत्त्वाचा भाग त्याच्या खर्चात जातो. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत, खर्चाच्या गुणोत्तरातील थोडासा फरक देखील तुमच्या गुंतवणुकीच्या वाढीवर लक्षणीय परिणाम करू शकतो.
फंड निवडताना एक्सपेन्स रेशोची विशेष काळजी घ्याम्युच्युअल फंडांचे मूल्यमापन करताना, समान फंडांच्या खर्चाच्या गुणोत्तरांची तुलना करणे आवश्यक आहे. कमी खर्चाच्या गुणोत्तरांना प्राधान्य दिले जाते. कारण, त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळतो. पण, खर्चाचे प्रमाण कमी करताना व्यवस्थापन गुणवत्ता आणि सेवा यांच्याशी तडजोड होणार नाही याची खात्री करा. म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी खर्चाच्या गुणोत्तराकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वित्तीय नियोजकांचे म्हणणे आहे. काही म्युच्युअल फंडाचे एक्सपेन्स रेशो जास्त असतो, मात्र त्यांचा वार्षिक परतावाही जास्त असेल तर या फंडातील गुंतवणूक तुम्हाला अधिक फायदेशीर ठरेल. याउलट काहींचा एक्सपेन्श रेशो कमी असेल पण त्यांचा वार्षिक परतावाही कमी असेल तर असा फंड निवडणे शहाणपणाचे ठरणार नाही.
डिस्क्लेमर : यामध्ये म्युच्युअल फंडाची माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.