Join us

₹१०००० च्या SIP नं बनवला ३ कोटींचा फंड, या फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:59 IST

Mutual Fund SIP: भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. दीर्घकाळ चाललेल्या या घसरणीत गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लाल झाले आहेत. बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेकांचा म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओही निगेटिव्ह झालाय.

Mutual Fund SIP: भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. दीर्घकाळ चाललेल्या या घसरणीत गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लाल झाले आहेत. बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेकांचा म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओही निगेटिव्ह झालाय. मात्र, या घसरणीच्या काळात अशा अनेक म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिलाय. आज आम्ही तुम्हाला एका अशा स्कीम्सबद्दल सांगणार आहोत ज्यानं २५ वर्षांत केवळ १०,००० रुपयांच्या एसआयपीचं रूपांतर ३ कोटी रुपयांमध्ये केलंय. याशिवाय एका स्कीमनं १८ वर्षांत १०,००० रुपयांच्या एसआयपीचं रूपांतर १.१८ कोटी रुपयांमध्ये केलंय.

क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड (Quant ELSS Tax Saver Fund)

क्वांटने एप्रिल २००० मध्ये ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड सुरू केला. या म्युच्युअल फंड स्कीमनं सुरू झाल्यापासून आतापर्यंत १५.४१ टक्के परतावा दिलाय. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीनं २००० मध्ये क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडात १०,००० रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्याची एकूण गुंतवणूक आज २८.८० लाख रुपये झाली असती आणि त्याच्या फंडाचं एकूण मूल्य ३.०३ कोटी रुपये झालं असतं.

डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड (DSP ELSS Tax Saver Fund)

डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड जानेवारी २००७ मध्ये सुरू करण्यात आला होता. या फंडानं लाँच झाल्यापासून आतापर्यंत एकूण १५.५३ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं २००७ मध्ये डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडात १०,००० रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्याची एकूण गुंतवणूक आज २१.६० लाख रुपये झाली असती आणि त्याच्या फंडाचं एकूण मूल्य १.१८ कोटी रुपये झालं असतं.

ईएलएसएस फंड म्हणजे काय?

ईएलएसएस ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम आहे. हे फंड ३ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येतात. त्यांना टॅक्स सेव्हर फंड म्हणतात कारण ते इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधिन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पैसागुंतवणूक