Join us

थेंबे थेंबे तळे साचे! १० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:38 IST

Top-performing mutual funds : महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पाहूया कोणता आहे हा फंड, ज्यानं हे करून दाखवलंय.

Top-performing mutual funds : महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते का? जर ती योग्य ठिकाणी गुंतवली गेली आणि संयम ठेवला तर नक्कीच ही गुंतवणूक तुम्हाला यशस्वी बनवू शकते. देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये हे शक्य झालंय. एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड (HDFC Balanced Advantage Fund) असं या फंडाचं नाव आहे. सप्टेंबर २००० मध्ये सुरू झालेल्या या फंडान २४ वर्षांपेक्षा अधिक कालावधीत १०,००० रुपयांच्या मासिक एसआयपीचं (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) रूपांतर ३.८६ कोटी रुपयांमध्ये केलंय.

गेल्या काही वर्षांत या फंडाने आपल्या श्रेणी आणि बेंचमार्क निर्देशांकाला ((NIFTY 50-TRI) मागं टाकलं आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षभरात यानं ११.८३ टक्के परतावा दिलाय, तर बेंचमार्क परतावा ६.२९ टक्के होता. तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या कालावधीत कंपनीनं अनुक्रमे १९.३२ टक्के आणि १८.९६ टक्के परतावा दिलाय.

काय आहे विशेष?

या फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत याला खास बनवते. हा फंड इक्विटी आणि डेट (बाँड) मध्ये गुंतवणूक करतो आणि बाजारातील परिस्थितीनुसार त्यांचं गुणोत्तर बदलते. फंडाकडे सध्या ६६ टक्के इक्विटी, ३०.०९ टक्के डेट आणि ३.९१ टक्के अन्य असेट्स आहेत.बँकिंग क्षेत्रात या फंडाची सर्वाधिक गुंतवणूक (२४.६२ टक्के) आहे, जी या श्रेणीच्या सरासरी २०.०३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय सरकारी बाँड्स (१४.२८ टक्के) आणि आर्थिक क्षेत्रात (११.२२ टक्के) ही कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते.

काय म्हणाले एक्सपर्ट?

"एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडानं आपल्या कामगिरीत सातत्य राखलं आहे. त्याचा डायनॅमिक पोर्टफोलिओ बाजारातील चढउतारांमध्येही टिकाव धरुन आहे. जर तुमच्याकडे दीर्घकालावधी असेल आणि कमी जोखीम घ्यायची असेल तर हा फंड चांगला पर्याय आहे," असं इकॉनॉमिक टाईम्सनं या क्षेत्रातील जाणकार श्रृती जैन यांच्या हवाल्यानं म्हटलंय.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाविषयी माहिती देण्यात आली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा