PMSBY: आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अचानक एखादा अपघात घडल्यास कुटुंबाला पैशांची सर्वात जास्त गरज असते. अशावेळी, विमा किंवा आपत्कालीन निधी तयार ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. पण, वाढत्या खर्चामुळे मोठा आपत्कालीन निधी तयार करणे अनेकांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, विमा हा एक उत्तम आणि परवडणारा पर्याय आहे.
केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना' (PMSBY) अशाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी एक वरदान आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त २० रुपये आहे, जो दोन कप चहाच्या किमतीपेक्षाही कमी आहे. म्हणजेच, महिन्याला २ रुपये पेक्षा कमी प्रीमियममध्ये तुम्हाला अपघाती विमा संरक्षण मिळते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) काय आहे?देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कोणत्याही अपघाताच्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी ही योजना सुरू केली. ही एक अपघाती विमा योजना आहे, जी अत्यंत कमी प्रीमियममध्ये अपघाती कव्हर प्रदान करते.
या योजनेचे फायदे
- तुम्हाला वर्षाला फक्त २० रुपये भरावे लागतात.
- या प्रीमियममध्ये तुम्हाला २ लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण मिळते.
- जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात.
- जर विमाधारक अपघातात पूर्णपणे अपंग झाला (उदा. दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले), तर त्याला २ लाख रुपये विमा म्हणून मिळतात.
- जर विमाधारक अंशतः अपंग झाला (उदा. एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावला), तर त्याला १ लाख रुपये विमा संरक्षण मिळते.
- हा विमा दरवर्षी नूतनीकरण करता येतो.
या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम दरवर्षी तुमच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. ही रक्कम दरवर्षी १ जूनपूर्वी खात्यातून वजा होते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
- अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असावे. ७० वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसी आपोआप संपते.
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे कोणत्याही बँकेत सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे.
- प्रीमियमची रक्कम दरवर्षी बँक खात्यातून आपोआप कापण्यासाठी अर्जदाराने संमती देणे गरजेचे आहे.
- जर कोणत्याही कारणास्तव तुमचे बँक खाते बंद झाले, तर ही पॉलिसी देखील कालबाह्य होईल.
- पॉलिसीचा कव्हर कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे पर्यंत असतो.
वाचा - SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
अर्ज कसा करायचा?
- या विमा योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे.
- तुम्ही तुमच्या घराजवळील बँकेच्या शाखेत (ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे) अर्ज करू शकता.
- बँकेकडून तुम्हाला योजनेशी संबंधित फॉर्म मिळेल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, बँक पासबुक) फॉर्मसोबत जोडून बँकेत जमा करा.