Join us

नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:00 IST

Job Loss Insurance : नोकरी गमावल्यास हा विमा तुम्हाला आर्थिक मदत प्रदान करतो. तो सहसा गृहकर्ज किंवा इतर विमा योजनांसह अतिरिक्त म्हणून उपलब्ध असतो.

Job Loss Insurance : गेल्या काही वर्षात विशेषकरुन खासगी क्षेत्रात खूप अनिश्चितता आली आहे. कधी कुणाची नोकरी जाईल याची काही शाश्वती नाही. यामुळे सध्याच्या अस्थिर काळात नोकरी जाण्याची भीती अनेकांना असते. या भीतीमुळे ईएमआय आणि इतर खर्चांची चिंता वाढते. जर तुम्हालाही अशीच काही चिंता सतावत असेल, तर त्यावर एक चांगला उपाय उपलब्ध आहे, ज्याला 'जॉब लॉस इन्शुरन्स' किंवा उत्पन्न संरक्षण विमा असे म्हणतात.

जॉब लॉस इन्शुरन्स म्हणजे काय?जॉब लॉस इन्शुरन्स हा एक प्रकारचा विमा आहे, जो नोकरी गमावल्यास आर्थिक संरक्षण देतो. हा विमा सहसा स्वतंत्रपणे उपलब्ध नसतो, पण गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जासोबत 'ॲड-ऑन' म्हणून घेतला जातो. याचा मुख्य उद्देश हाच आहे की, जर तुमची नोकरी गेली, तर तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जावेत आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होऊ नये.

हा विमा कसा काम करतो?समजा तुम्ही घर, गाडी किंवा कोणतेही वैयक्तिक कर्ज घेतलं आहे. अशात तुमची नोकरी अचानक गेली, तर या विमा पॉलिसीनुसार विमा कंपनी काही महिन्यांसाठी तुमच्या ईएमआयचे पैसे भरेल. ही मुदत साधारणपणे ३ ते ६ महिन्यांची असते. त्यामुळे, अचानक आलेल्या आर्थिक संकटातून तुम्हाला मोठा दिलासा मिळतो.

हा विमा तुम्ही कर्ज घेतानाच घेऊ शकता. अनेक बँका आणि एनबीएफसी कंपन्या हा एक ॲड-ऑन म्हणून देतात, तर काही विमा कंपन्या तो स्वतंत्रपणेही विकतात. यासाठी तुम्हाला एक प्रीमियम भरावा लागतो, जो तुमच्या कर्जाची रक्कम आणि विम्याच्या मुदतीवर अवलंबून असतो.

 

हा विमा कधी उपयोगी पडत नाही?हा विमा खास करून अशा लोकांसाठी आहे जे पगारदार आहेत आणि पूर्णवेळ नोकरी करतात. मात्र, जर तुमची नोकरी गैरशिस्त किंवा तुम्ही स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे गेली, तर हा विमा काम करणार नाही. परंतु, जर तुमच्या कंपनीने तुम्हाला कामावरून कमी केले असेल किंवा कंपनी बंद झाली असेल, तर तुम्ही या विम्याचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरता. थोडक्यात, जॉब लॉस इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा आर्थिक उपाय आहे, जो नोकरी जाण्याच्या भीतीने त्रस्त असलेल्यांसाठी एक मोठा आधार ठरू शकतो.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा