Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ लाखांपर्यंत मदत देणारा इन्शुरन्स प्लॅन, प्रीमिअम इतका की महिन्याला ₹३६ वापरले तरी होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:16 IST

देशातील प्रत्येक घटकाला लाभ मिळावा या उद्देशानं भारत सरकार अनेक योजना तयार करते.

देशातील प्रत्येक घटकाला लाभ मिळावा या उद्देशानं भारत सरकार अनेक योजना तयार करते. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY). या योजनेत, विमाधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनी किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांची रक्कम मिळते. कुटुंबाला कठीण काळात आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं ही योजना चालवली जाते. त्यासाठी वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. परंतु प्रीमियम इतका स्वस्त आहे की तुम्ही दर महिन्याला ३६-३७ रुपये वाचवले तरी प्रीमियमचा वार्षिक खर्च सहजपणे भरून निघेल. सरकारच्या या खास विमा योजनेबद्दल आपण जाणून घेऊ.कोण खरेदी करू शकतं१८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही विमा योजना खरेदी करू शकते. PMJJBY योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला ४३६ रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो. जर तुम्ही ४३६ रुपये १२ भागांमध्ये विभागले तर मासिक खर्च सुमारे ३६.३३ रुपये होईल. ही अशी रक्कम आहे जे सामान्य व्यक्ती सहज जमवू शकतात. या विमा योजनेचा कव्हर पिरिअड १ जून ते ३१ मे पर्यंत आहे, म्हणजेच तुम्ही ती वर्षातील कोणत्याही महिन्यात ही स्कीम खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला फक्त ३१ मे पर्यंतच कव्हरेज मिळेल. १ जून रोजी तुम्हाला त्याचं पुन्हा नूतनीकरण करावं लागेल. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून २ लाख रुपये दिले जातात.कुठून घ्याल पॉलिसीही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. विमा पॉलिसीच्या संमतीपत्रात काही विशिष्ट आजारांचा उल्लेख केला आहे, तुम्हाला त्या आजारांनी ग्रासलेलं नसल्याचं जाहीरनाम्यात घोषित करावं लागेल. तुमची यात खोटी माहिती दिल्याचं समजल्यास तुमच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हालाही ही पॉलिसी घ्यायची असेल, तर तुमचं खातं असलेल्या बँकेतून तुम्ही याचा फॉर्म घेऊ शकता. फॉर्म भरल्यानंतर उर्वरित काम बँकेकडूनच केलं जातं.या आहेत अटी

  • जर तुम्हाला भारत सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साइज फोटो असणं आवश्यक आहे. 
  • तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करावा लागेल कारण तुमची ओळख आधारद्वारे व्हेरिफाय केली जाते.
  • या पॉलिसीचे वर्ष १ जून ते ३१ मे पर्यंत आहे. एक वेळची गुंतवणूक एका वर्षासाठी असते.
  • जर तुम्ही ऑटो रिन्युअल पर्याय निवडला असेल, तर दरवर्षी २५ मे ते ३१ मे दरम्यान, तुमच्या खात्यातून पॉलिसीचे ४३६ रुपये आपोआप कापले जातात.
  • तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ फक्त एका बँक खात्याद्वारे घेऊ शकता. ही स्कीम इतर कोणत्याही खात्याशी जोडली जाऊ शकत नाही.
  • पॉलिसी घेतल्याच्या ४५ दिवसांनंतरच या विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र, अपघातात मृत्यू झाल्यास ४५ दिवसांची अट वैध नाही.
टॅग्स :पैसासरकार