Join us

ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:02 IST

Income Tax Return : लोकांच्या सोयीचा विचार करून, आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न भरण्याची तारीख आधीच वाढवली आहे. आता काही सीए फर्म्स ती आणखी वाढवण्याची मागणी करत आहेत.

Income Tax Return : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे, पण आता ही मुदत आणखी वाढवण्याची मागणी कर तज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) करत आहेत. तांत्रिक अडचणी, फॉर्ममध्ये वारंवार होणारे बदल आणि पोर्टलच्या समस्यांमुळे ही मागणी जोर धरत आहे.

या मागणीमध्ये फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन, सुरत यांसारख्या मोठ्या संघटनांचा समावेश आहे. त्यांनी सरकारला आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक समस्या आणि फॉर्ममध्ये होणाऱ्या बदलांमुळे करदात्यांना प्रचंड त्रास होत असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.

मुख्य कारणे काय आहेत?या दोन्ही संघटनांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या अध्यक्षांना पत्र लिहून आयटीआरची अंतिम मुदत वाढवण्याची विनंती केली आहे.तांत्रिक बिघाड आणि फॉर्ममधील बदल : FKCCI ने आपल्या पत्रात म्हटले आहे की, आयटीआर फॉर्ममध्ये झालेले मोठे बदल, तांत्रिक बिघाड आणि सिस्टिमच्या समस्यांमुळे करदात्यांना आणि व्यावसायिकांना खूप अडचणी येत आहेत. FKCCI चे अध्यक्ष एम.जी. बालकृष्ण यांनी सांगितले की, "आयटीआर फॉर्ममधील बदल आणि सिस्टिममधील तांत्रिक बिघाडामुळे रिटर्न भरण्याच्या कामाला उशीर होत आहे."

नैसर्गिक आपत्ती आणि सणासुदीचा काळ : चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन, सुरतने देखील तांत्रिक बिघाड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अंतिम मुदत १५ सप्टेंबरच्या पुढे वाढवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीत त्यांनी हेही म्हटले आहे की, आता सणासुदीचा काळ सुरू होत आहे. अशावेळी, करदाते सणांची तयारी करणार की आयटीआरच्या तांत्रिक अडचणींमध्ये अडकून राहणार?

वाचा - पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

'सॉफ्टवेअरच्या अडचणी डोकेदुखी'चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन, सुरतचे अध्यक्ष हार्दिक काकडिया यांनी सांगितले की, "आजकाल कराची कामे टॅक्स पोर्टलवर अवलंबून आहेत. त्यामुळे, वेगवेगळ्या फॉर्म्ससाठी आवश्यक सॉफ्टवेअर अपडेट्स वेळेवर येणे खूप महत्त्वाचे आहे. पण, सीबीडीटी हे फॉर्म उशिरा जारी करते आणि जी सॉफ्टवेअर कंपनी हे अपडेट्स देते (सध्या इन्फोसिस लिमिटेड), तीदेखील खूप वेळ घेते. जेव्हा हे अपडेट्स येतात, तेव्हा त्यांच्यासोबत तांत्रिक समस्याही येतात, जे वापरकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरतात."

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादाकर