ITR Filing Last date extension : देशातील कोट्यवधी करदात्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत आज, १५ सप्टेंबर रोजी संपत आहे. जसजशी डेडलाइन जवळ आली, तसतसे करदात्यांमध्ये तणाव वाढला आहे. पोर्टलवर येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक लोकांनी सोशल मीडियावर मुदत वाढवण्याची मागणी केली. याच दरम्यान, सोशल मीडियावर मुदतवाढ मिळाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. पण, याबाबत आता खुद्द प्राप्तीकर विभागाने माहिती दिली आहे.
आयकर विभागाने दिले स्पष्टीकरणया चर्चेवर अखेर आयकर विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. रविवारी उशिरा रात्री आयकर विभागाने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून स्पष्ट केले की, 'अद्याप कोणत्याही मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.' याचाच अर्थ, आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ हीच आहे. यापूर्वी, ३१ जुलैची डेडलाइन वाढवून १५ सप्टेंबर करण्यात आली होती.
पोर्टलची अडचण आणि लोकांची मागणीशनिवार आणि रविवार या दोन दिवसांत आयकर विभागाचे पोर्टल अनेकवेळा मंदावले होते किंवा त्यात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त करत, 'जेव्हा पोर्टल योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा मुदत वाढवणे आवश्यक आहे' अशी मागणी केली. याच कारणामुळे रविवार रात्रीपर्यंत सोशल मीडियावर मुदतवाढीची चर्चा वेग पकडत होती.
उशिरा आयटीआर भरल्यास मोठे नुकसानजर कोणत्याही करदात्याने आज, १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर दाखल केला नाही, तर त्याला 'बिलेटेड रिटर्न' भरावे लागेल. 'बिलेटेड आयटीआर' भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे. मात्र, उशिरा भरल्यामुळे तुम्हाला खालीलप्रमाणे नुकसान होऊ शकते:
५ लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर १,००० रुपये दंड.
- ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ५,००० रुपये दंड.
- उशिरा भरलेल्या करावर अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'बिलेटेड आयटीआर' मध्ये तुम्ही तुमची कर प्रणाली बदलू शकत नाही, तसेच मागील वर्षांतील तोटा पुढील वर्षांसाठी पुढे नेऊ शकत नाही.
वाचा - २२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
सोशल मीडियावर मुदतवाढीबद्दल चर्चा सुरू असली तरी, जोपर्यंत सीबीडीटीकडून अधिकृत अधिसूचना जारी होत नाही, तोपर्यंत करदात्यांनी आजच आयटीआर दाखल करणे महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी लवकर लॉग-इन करणे फायद्याचे ठरेल.