Join us

तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:45 IST

ITR Refund : जर तुमचा परतावा अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व प्रलंबित परतावे लवकरच मंजूर केले जातील, असं आश्वासन प्राप्तीकर विभागाने दिलं आहे.

ITR Refund : जर तुम्हीही तुमच्या प्राप्तीकर परताव्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ज्यांचे रिफंड अडकले होते, त्यातील अडचणी आता दूर झाल्या असून पैसे पाठवण्यात आल्याचे आयकर विभागाने जाहीर केले आहे. एका करदात्याने विचारलेल्या प्रश्नावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट सोशल मीडियावरुन आयकर विभागाकडे या विलंबाबद्दल विचारणा केली होती, त्यानंतर विभागाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

विलंबाचे कारण काय?आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परताव्याला झालेला विलंब हा सिस्टीममध्ये असलेल्या स्वयंचलित पडताळणी आणि अतिरिक्त जोखीम मूल्यांकन तपासणी यामुळे झाला होता. कोणत्याही चुकीच्या किंवा बनावट परताव्याचा दावा पास होऊ नये, यासाठी या सुरक्षा तपासण्या लावण्यात आल्या आहेत.

विभागाने म्हटले आहे की, या तपासण्यांमुळे काही वेळा प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण त्या पूर्णपणे अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आहेत. सध्या, थांबलेल्या सर्व आयटीआरवर प्रक्रिया पूर्ण करून परतावे जारी करण्यात आले आहेत. विभाग उर्वरित प्रलंबित आयटीआरची प्रक्रिया जलद करण्यासाठी लक्ष ठेवून आहे जेणेकरून ते लवकरच निकाली काढले जातील.

सोप्या भाषेत अर्थजर तुमचा परतावा अजूनही अडकला असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. आयकर विभागाने आश्वासन दिले आहे की, प्रणालीमध्ये होणारा विलंब केवळ सुरक्षितता आणि अचूकतेसाठी आहे आणि सर्व प्रलंबित परतावे लवकरच क्लिअर केले जातील.

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादानिर्मला सीतारामन