Join us

घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:29 IST

IT Raid Alert : डिजिटायझेशनच्या या युगात, सर्व काही ऑनलाइन होत आहे. खरेदीपासून ते पेमेंट करण्यापर्यंत, सर्व काही फक्त एका क्लिकवर केले जाते. पण, बरेच लोक अजूनही व्यवहारांसाठी रोख रक्कम वापरतात.

IT Raid Alert : पूर्वी कुठलाही आर्थिक व्यवहार करायचं म्हटलं की रोख तपासली जायची. मात्र, आता १ रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतचे व्यवहार मोबाईलवरुन एका क्लिकवर होत आहेत. जमाना डिजिटल झाला असला तरी अनेक लोक आजही घरामध्ये रोख रक्कम (कॅश) ठेवतात आणि रोजच्या व्यवहारांसाठी त्याचा वापर करतात. अनेकदा आयकर विभागाच्या छापेमारीच्या बातम्याही समोर येतात. अशावेळी, मनात हा प्रश्न येतो की, कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम ठेवता येते? चला, याबद्दल भारतीय कायदा काय सांगतो ते समजून घेऊया.

रोख रक्कम ठेवण्यावर कोणतीही मर्यादा आहे का?घरात रोख रक्कम ठेवण्यावर आयकर विभागाने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तुमच्याकडे असलेली रक्कम छोटी असो वा मोठी, ती घरात ठेवणे कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नाही. मात्र, याला एकच अट आहे - तुमच्याकडे त्या पैशाचा वैध स्रोत असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की घरात ठेवलेली रक्कम तुमच्या पगारातून किंवा व्यवसायातून कमावलेली आहे, किंवा ती कोणत्याही कायदेशीर व्यवहाराचा भाग आहे, तर तुम्ही कितीही मोठी रक्कम घरात ठेवू शकता. समस्या तेव्हा येते, जेव्हा तुम्ही उत्पन्नाचा स्रोत सिद्ध करू शकत नाही.

आयकर अधिनियम काय सांगतो?आयकर अधिनियम कलम ६८ ते ६९B मध्ये रोख रक्कम आणि मालमत्तेशी संबंधित काही महत्त्वाचे नियम नमूद केले आहेत.

  • कलम ६८: जर तुमच्या पासबुक आणि कॅशबुकमध्ये काही रक्कम जमा झाल्याचे दिसत असेल. परंतु, तुम्ही तिचा स्रोत सांगू शकत नसाल, तर ती रक्कम 'अनक्लेम्ड इन्कम' मानली जाईल.
  • कलम ६९: तुमच्याकडे रोख रक्कम किंवा कोणतीही गुंतवणूक आहे, पण, तिचा स्त्रोत तुमच्याकडे नसेल तर ती 'अघोषित उत्पन्न' मानली जाईल.
  • कलम ६९बी: तुमच्या घोषित उत्पन्नापेक्षा तुमच्याकडे अधिक मालमत्ता किंवा रोख रक्कम असेल. परंतु, तुम्ही तिचा स्रोत सांगत नसाल, तर तुमच्यावर कर आणि दंड आकारला जाईल.

वाचा - पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट

स्त्रोत सांगता आला नाही तर...तपासणी किंवा छापामारीदरम्यान तुमच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आणि तुम्ही तिचा योग्य हिशेब देऊ शकला नाही, तर ती संपूर्ण रक्कम 'अघोषित उत्पन्न' मानली जाईल. अशा परिस्थितीत:

  1. तुमच्यावर मोठी कर आकारणी केली जाऊ शकते.
  2. जप्त केलेल्या रकमेवर ७८ टक्के पर्यंत दंड लागू होऊ शकतो.
  3. जर विभागाला करचोरीचा संशय आला, तर तुमच्यावर खटलाही चालवला जाऊ शकतो.
  4. याचा अर्थ, घरात रोख रक्कम किती आहे, यापेक्षा ती कुठून आली हे सिद्ध करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादाकर