अदानी समूहाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ७४,९४५ कोटी रुपये कर भरून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षातील ५८,१०४ कोटी रुपयांपेक्षा तब्बल २९ टक्क्यांनी अधिक आहे. या आकड्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर तसेच कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी करण्यात आलेली देणी समाविष्ट आहेत.
समूहाच्या निवेदनानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत मिळालेल्या भक्कम नफ्यामुळे हा करभरणा अधिक वाढला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL), अदानी सिमेंट लिमिटेड (ACL), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ), आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) यांनी सर्वाधिक कर भरला आहे.
सात लिस्टेड कंपन्यांच्या वार्षिक अहवालावर आधारित
अदानी समूहाने आपल्या निवेदनात म्हटले की, "आम्ही भरलेला एकूण कर सात लिस्टेड कंपन्यांच्या वार्षिक अहवालावर आधारित आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अंबुजा सिमेंट्सद्वारा जारी करण्यात आलेले आकडे यात सामील आहेत." यासोबतच अदानी समूहाच्या नियंत्रणाखाली असलेल्या तीन इतर लिस्टेड कंपन्यांचा एनडीटीव्ही, एसीसी आणि सांघी इंडस्ट्रीज यांनी भरलेला कर देखील या एकूण योगदानात धरला गेला आहे.
शेअर बाजारात उत्साही प्रतिसाद
या वित्तीय योगदानाच्या घोषणेनंतर गुरुवारी शेअर बाजारात अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अंबुजा सिमेंट्स, एसीसी, आणि अदानी टोटल गॅस यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)