Join us

UPI पासवर्ड प्रणालीत बदल होणार, NPCI आणतंय नवी पेमेंट सिस्टम; Gpay, PhonePe यूझर्ससाठी महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:52 IST

सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ४ किंवा ६ अंकी पिन पासवर्ड टाकावा लागतो, पण आता त्यात बदल होणार आहेत. पाहा काय होणार बदल आणि काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं.

ऑनलाइन पेमेंट पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित करता यावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयनं एक नवीन प्लॅन तयार केला आहे. मात्र, त्याचा थेट परिणाम ऑनलाइन पेमेंट युजर्सवर होणार आहे. सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ४ किंवा ६ अंकी पिन पासवर्ड टाकावा लागतो, पण आता त्यात बदल होणार आहेत.

एनपीसीआय यूपीआय-आधारित ऑनलाइन पेमेंटला पिन पासवर्डऐवजी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी काही स्टार्टअप्सशी चर्चा करत आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही ओटीपी आणि कार्ड व्यवहारांसाठी बँकांना नवे पर्याय शोधण्यास सांगितलं होतं. आजच्या काळात कार्ड पेमेंट करण्यासाठी मोबाईल ओटीपीची गरज असते. तसंच यूपीआय पेमेंटसाठी पिन पासवर्ड आवश्यक असतात. परंतु नवीन बदलांमुळे युजर्स फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकतील. आयफोन डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी फेस स्कॅन करावं लागतं हे तुम्हाला माहित असेलच. त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकाल.

ऑनलाइन फ्रॉडवर आरबीआय सतर्क

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, पिन पासवर्डमुळे अनेक ऑनलाइन फ्रॉड होत आहेत. अशा तऱ्हेनं रिझर्व्ह बँकेला ऑनलाइन पेमेंटची चिंता सतावत आहे. यामुळेच आरबीआयनं बँकांना इतर पर्याय शोधण्यास सांगितलंय. पिन बेस्ड मोबाइल पेमेंट करून ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रिपोर्टनुसार, एनपीसीआयकडून येत्या ३ महिन्यांत बायोमेट्रिक आधारित यूपीआय पेमेंट सुरू केले जाऊ शकते. त्यासाठी एनपीसीआयकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :बँकपैसाभारतीय रिझर्व्ह बँक