Join us

UPI down: एका महिन्यात तिसऱ्यांदा PhonePe, Google Pay ठप्प; ट्रान्झॅक्शन करण्यात अनेकांना अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:32 IST

UPI Down: गुगलपे, फोनपे आणि पेटीएम सारख्या अॅप्सच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करणाऱ्या हजारो युजर्सना पुन्हा एकदा समस्या येत आहेत.

UPI Down: गुगलपे, फोनपे आणि पेटीएम सारख्या अॅप्सच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करणाऱ्या हजारो युजर्सना पुन्हा एकदा समस्या येत आहेत. शनिवारी अनेकजण यूपीआय पेमेंट करू शकत नसल्याची तक्रार करत आहेत. डाऊनडिटेक्टर या वेबसाईटवर दुपारी एक वाजेपर्यंत २२०० हून अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. बऱ्याच लोकांनी पेमेंट फेल झाल्याची माहिती दिली. मोठ्या संख्येने लोकांना फंड ट्रान्सफर करता येत नसल्याची तक्रार करण्यात आली. खरेदीदरम्यान पेमेंट फेल झाल्याने काही युजर्स त्रस्त झालेत. एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय पेमेंट ठप्प झाल्याबाबत कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. नेहमीप्रमाणे तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचं कारण देण्यात आलं. महिन्याभरात तिसऱ्यांदा यूपीआय पेमेंट करताना समस्या निर्माण झाली आहे.

काय म्हटलंय एनपीसीआयनं?

एनपीसीआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात एनपीसीआयला सध्या अधूनमधून तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे यूपीआय व्यवहार अंशतः डिक्लाईन होत असल्याचं म्हटलं. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं.

सातत्यानं समस्या

यूपीआय डाऊन होण्याची समस्या अलीकडच्या काळात अनेकदा समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यांत जवळपास ३ वेळा असं घडलं आहे, ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. आजकाल लोक पेमेंटसाठी यूपीआयचा सर्वाधिक वापर करतात. बहुतेक लोक आजकाल आपल्यासोबत रोख रक्कम नेत नाहीत. त्यामुळे अनेकदा अशी तांत्रिक अडचण आल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याआधीही यूपीआय डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली होती.

टॅग्स :पैसागुगल पे