Cheque Clearance Time : जर तुम्ही चेकने पेमेंट करत असाल किंवा पैसे स्वीकारत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला चेक क्लिअर होण्यासाठी १-२ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. ४ ऑक्टोबर २०२५ पासून, तुम्ही बँकेत जमा केलेला चेक त्याच दिवशी क्लिअर होईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार ही सुविधा सुरू केली जात आहे. यामुळे तुमचा पैसा वेगाने तुमच्या खात्यात जमा होईल आणि बँकिंगमधील विलंब कमी होईल. सध्या आयसीआयसीआय बँक ही सुविधा लागू करत आहे.
काय आहे ही नवीन सुविधा?आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी साधारणपणे १ ते २ दिवसांचा वेळ लागतो. पहिल्या दिवशी चेक स्कॅन होतो, तर दुसऱ्या दिवशी त्याचे सेटलमेंट होते. मात्र, आता आरबीआयने ही प्रक्रिया अधिक वेगवान केली आहे. या नव्या नियमानुसार, आता बँक दिवसभर चेक स्कॅन करून थेट क्लिअरिंग हाऊसकडे पाठवतील आणि ते त्वरित संबंधित बँकेला पाठवले जातील. अशा प्रकारे, ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहील आणि तुमचा चेक त्याच दिवशी क्लिअर होईल.
क्लिअरन्स कधी आणि कसा होईल?ही नवी व्यवस्था ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. त्या दिवसापासून, बँकांमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत 'प्रेझेंटेशन सेशन' असेल, ज्यात सर्व चेक स्कॅन होऊन लगेच क्लिअरिंग हाऊसकडे पाठवले जातील. तुम्हाला फक्त एवढेच लक्षात ठेवावे लागेल की, तुमचा चेक दिलेल्या वेळेच्या आधी बँकेत जमा करावा. वेळेत जमा झालेला चेक त्याच दिवशी क्लिअर होईल.
पॉझिटिव्ह पे आणि त्याची गरजICICI बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पे’ (Positive Pay) करणे अनिवार्य आहे. पॉझिटिव्ह पेमध्ये तुम्ही चेकची मुख्य माहिती (खाते क्रमांक, चेक नंबर, पैसे घेणाऱ्याचे नाव, रक्कम आणि तारीख) बँकेला आधीच कळवता. यामुळे चेक क्लिअर करण्यापूर्वी बँकेला त्याची माहिती मिळते आणि फसवणुकीची शक्यता कमी होते.
जर तुम्ही ₹५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा चेक दिला आणि पॉझिटिव्ह पे केला नाही, तर तुमचा चेक नाकारला जाऊ शकतो. तसेच, पॉझिटिव्ह पे नसलेल्या चेकवर कोणताही वाद झाल्यास आरबीआयची सुरक्षा यंत्रणा लागू होणार नाही.
वाचा - फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
चेक जमा करताना काय काळजी घ्याल?
- चेकवर अंक आणि शब्दांत लिहिलेली रक्कम जुळत असल्याची खात्री करा.
- चेकची तारीख वैध असावी, म्हणजे ती खूप जुनी किंवा भविष्यातील नसावी.
- चेकवर खाडाखोड किंवा कोणतेही बदल करू नका.
- चेकवर तीच सही करा, जी तुमच्या बँक रेकॉर्डमध्ये आहे.
या नव्या नियमाचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित करू शकता.