RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. त्याचबरोबर नियमांचं पालन न करणाऱ्या बँकांवरही कडक कारवाई केली जाते. नियमांचे पालन न केल्यानं आरबीआयनं बँकांना लाखो-कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे, असं अनेकदा घडलंय. आता आरबीआयनं कडक कारवाई करत देशातील दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या दोन बँकांना आरबीआयनं दंड ठोठावलाय. जाणून घेऊया काय आहे प्रकरण?
नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयनं एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि पंजाब अँड सिंध बँकेला (Punjab and Sindh Bank) दंड ठोठावला आहे. आरबीआयनं एचडीएफसी बँकेला ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर आरबीआयने पंजाब अँड सिंध बँकेवर ६८.२० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
दंड आकारण्याचे कारण काय?
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेला आरबीआयनं केवायसीच्या काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. आरबीआयने एचडीएफसी बँकेला दंड ठोठावल्यानंतर आपलं कामकाज सुधारण्याचा इशारा दिला आहे.
बँकांनी दिलेल्या मोठ्या कर्जाची माहिती साठवणं, सर्वसामान्यांना बँकिंग सेवा पुरविणे आणि त्यांच्यासाठी बेसिक सेव्हिंग्ज बँक खाती (बीएसबीडीए) उघडण्याशी संबंधित काही सूचनांचे पालन न केल्यास ६८.२० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही बँकांवरील दंडाचा परिणाम बँकांच्या ग्राहकांवर होणार नाही. ग्राहकांना बँकेच्या सर्व सुविधांचा पूर्वीप्रमाणेच लाभ घेता येणार आहे, असं पंजाब अँड सिंध बँकेला दंड ठोठावण्याचं कारण स्पष्ट करताना आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलंय.