ATM Transaction Charges: जर तुम्हाला एटीएममधून वारंवार पैसे काढण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बदलून टाका. जर तुम्ही असं केलं नाही तर १ मे पासून तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केलेत. हे नवे नियम १ मे २०२५ पासून देशभरात लागू होतील. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या बदलांचा उद्देश एटीएम वापरण्याच्या शुल्काबाबत पारदर्शकता आणणं हा आहे. यामुळे बँकांना एटीएम नेटवर्क चालवणंही सोपं होणारे.
खरं तर प्रत्येक बँक प्रत्येक ग्राहकाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका मर्यादेपर्यंत मोफत सुविधा देते. यात तुमच्या बँकेचं एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएमचा समावेश आहे. फ्री लिमिटनंतर बँक शुल्क आकारण्यास सुरुवात करते. १ मेपासून या शुल्कात वाढ होत आहे. फ्री लिमिटनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी १ मेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त २३ रुपये शुल्क आकारलं जाणारे. त्यावर स्वतंत्रपणे कर आकारणी केली जाईल. आतापर्यंत हे शुल्क २१ रुपयांपर्यंत होतं.
मोफत सुविधा किती वेळा?
- दिल्ली, मुंबई आदी महानगरांमध्ये ग्राहकांना महिन्यातून तीन वेळा मोफत एटीएम वापरता येतं.
- बिगर मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा पाच इतकी आहे. नॉन-मेट्रो शहरे म्हणजे मेट्रो शहरांइतकी मोठी नसलेली शहरं.
- ही मर्यादा पैसे काढणं आणि इतर प्रकारच्या व्यवहारांसाठी आहे. म्हणजेच तुम्ही महिन्यातून फक्त तीन किंवा पाच वेळा मोफत पैसे काढू शकता किंवा बॅलन्स चेक करू शकता.
बँकांचे वेगवेगळे नियम
काही बँकांनी जास्त ट्रान्झॅक्शनमध्ये सूट दिलीये. यात एचडीएफसी बँकेचाही समावेश आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांकडून केवळ एचडीएफसी एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. बॅलन्स चेक करणं, मिनी स्टेटमेंट जनरेट करणं आणि पिन बदलणं मोफत असेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे काढण्याबरोबरच बॅलन्स चेक करणं, मिनी स्टेटमेंट काढणं आणि पिन बदलणं यासाठी शुल्क आकारलं जाईल.