UPI Cash Withdrawal : सध्या रोख रक्कम हवी असेल तर बँक किंवा एटीम मशीनला पर्याय नाही. पण, दुर्गम भागात अजूनही एटीएम मशीन्स पोहचल्या नाहीत. मात्र, ही चिंता आता कायमची मिटणार आहे. स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढणे आता आणखी सोपे होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दिशेने मोठी तयारी करत आहे. एका अहवालानुसार, लवकरच देशभरातील २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉंडंट आउटलेट्सवर युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पैसे काढता येणार आहेत. यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) मंजुरी मागितली आहे.
बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे काय?बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे असे स्थानिक प्रतिनिधी जे दुर्गम भागांमध्ये बँकिंग सेवा पुरवतात, जिथे एटीएम किंवा बँकेच्या शाखा उपलब्ध नाहीत. हे स्थानिक प्रतिनिधी दुकानदार, स्वयंसेवी संस्था किंवा कोणतीही व्यक्ती असू शकते. सध्या लोक आधार-आधारित प्रमाणीकरण किंवा डेबिट कार्ड वापरून मायक्रो एटीएमद्वारे बीसी पॉइंट्सवरून पैसे काढतात.
व्यवहार कसा होईल?प्रस्तावित योजनेनुसार, या बीसी आउटलेट्सवर ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवरील कोणत्याही UPI ॲपचा वापर करून QR कोड स्कॅन करून रोख रक्कम काढू शकतील. या व्यवहाराची मर्यादा प्रति ट्रान्झॅक्शन १०,००० रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या निवडक एटीएमवर किंवा दुकानांमध्ये ही मर्यादा शहरांमध्ये १,००० रुपये आणि गावांमध्ये २,००० रुपये आहे.
वाचा - होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
या नव्या प्रणालीचा फायदा अशा ग्राहकांना होईल, ज्यांना फिंगरप्रिंट प्रमाणीकरणात अडचणी येतात किंवा ज्यांना डेबिट कार्ड वापरणे सोयीस्कर वाटत नाही. हे एक मोठे पाऊल आहे, जे बँकिंग सेवा अधिक सोयीस्कर बनवेल. एनपीसीआयने २०१६ मध्ये UPI लाँच केले होते आणि हे नवीन पाऊल त्याचाच विस्तार मानला जात आहे.