Join us

आता लाखांत नको कोटींचे आलिशान घरच द्या! दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 07:33 IST

देशात कोरोना महामारीपासून आपले हक्काचे स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे.

नवी दिल्ली :

देशात कोरोना महामारीपासून आपले हक्काचे स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. त्यामुळे घर खरेदीला जोर आला आहे. लोक आता लाखांत नव्हे तर थेट कोटीमधील घरांची खरेदी करत आहेत. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये दीड कोटीपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढून २५,६८० वर पोहोचली आहे. 

या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) महाग फ्लॅटची सर्वाधिक विक्री झाली आहे. एकूण विक्रीपैकी ५० टक्के विक्री मुंबईसह परिसरात झाली आहे. मालमत्ता सल्लागार ॲनारॉकच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  लक्झरी किंवा महाग घरांच्या श्रेणीत यावर्षी जोरदार कामगिरी झाली आहे. विकासकांनी देऊ केलेल्या सवलती आणि परदेशी भारतीय (एनआरआय)कडून मागणी यामुळे विक्री वाढली आहे, असे अहवालात म्हटले आहे. आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महाग फ्लॅटची विक्री २५,६८० युनिट्स इतकी झाली. 

एकूण किती घरे विकली?२०२२च्या पहिल्या सहा महिन्यांत सात शहरांमध्ये तब्बल १.८४ लाख घरे विकली गेली आहेत. यातील लक्झरी घरांचा वाटा १४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१९ मध्ये हे प्रमाण केवळ  सात टक्के होते.घरांची विक्री का वाढतेय? आलिशान घरांच्या विक्रीत तेजी येण्यामागे चार-पाच कारणे आहेत. पहिले म्हणजे या वर्षी अनेक आलिशान निवासी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्ण तयार झालेल्या घरांच्या मागणीत वाढ झाली आहे, कारण ग्राहकांना लवकरात लवकर नवीन घरात जायचे आहे. महामारीच्या काळात शेअर बाजारातून पैसे कमावणाऱ्या श्रीमंत व्यक्ती आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत. सध्या घरांच्या किमती वाढल्या आहेत. त्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने लोक घर खरेदी करत आहेत.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन