New UPI Rule : डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) १ ऑक्टोबरपासून UPI वरील व्यक्ती-ते-व्यक्ती (Person-to-Person - P2P) 'कलेक्ट रिक्वेस्ट' हे फीचर कायमस्वरूपी बंद करणार आहे. या निर्णयामुळे फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या सर्व UPI ॲप्सवर १ ऑक्टोबरनंतर P2P रिक्वेस्टचे व्यवहार होऊ शकणार नाहीत. फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी एनपीसीआयने हे पाऊल उचलले आहे.
'कलेक्ट रिक्वेस्ट' फीचर काय आहे?'कलेक्ट रिक्वेस्ट' किंवा 'पुल ट्रान्झॅक्शन' हे फीचर वापरकर्त्यांना UPI द्वारे दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे मागण्याची सुविधा देते. हे फीचर मित्र-मैत्रिणींकडून येणे असलेले पैसे मागण्यासाठी किंवा बिलांची वाटणी करण्यासाठी सोयीचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत स्कॅमर्सनी याचा गैरवापर सुरू केला होता.
स्कॅमर्स अनेकदा स्वतःला ओळखीचा संपर्क किंवा अधिकारी भासवून पैसे मागण्याच्या रिक्वेस्ट पाठवत असत आणि वापरकर्त्यांकडून त्या अप्रूव करून घेत असत. यामुळे वापरकर्त्यांच्या UPI खात्यातून पैसे परस्पर कापले जात होते. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी NPCI ने यापूर्वीच अशा रिक्वेस्टसाठी व्यवहाराची मर्यादा २,००० रुपयांपर्यंत मर्यादित केली होती. पण आता हे फीचर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
UPI पेमेंट्सवर काय परिणाम होईल?१ ऑक्टोबरनंतर तुम्ही UPI द्वारे फक्त दोनच प्रकारे पैसे पाठवू शकाल
- QR कोड स्कॅन करून पैसे पाठवणे.
- संपर्क क्रमांक वापरून थेट पैसे पाठवणे.
- या नव्या नियमामुळे, तुम्ही आता एखाद्या व्यक्तीकडून पैसे मागू शकणार नाही. मात्र, तुमच्या दैनंदिन UPI वापरासाठी QR कोड आणि थेट पेमेंट हे पर्याय नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
वाचा - कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
मर्चंट अकाउंट्सवर कोणताही परिणाम नाहीया बदलाचा ई-कॉमर्स कंपन्यांच्या 'कलेक्ट रिक्वेस्ट'वर कोणताही परिणाम होणार नाही. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, स्विगी, झोमॅटो आणि आयआरसीटीसीसारखे प्लॅटफॉर्म अजूनही त्यांच्या पेमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून तुमच्याकडून पेमेंटची रिक्वेस्ट पाठवू शकतील. अशा रिक्वेस्टसाठी स्पष्ट वापरकर्ता मंजुरी (User Approval) आणि UPI पिन ऑथेंटिकेशन आवश्यक असते, ज्यामुळे हे व्यवहार सुरक्षित मानले जातात.