Join us

Kotak Mahindra Bankला अपेक्षेपेक्षा २६ टक्के अधिक फायदा; निव्वळ नफा ३,४९५ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:48 IST

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँकेने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँकेने मार्चच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गत तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २६ टक्क्यांनी वाढून तो ३ हजार ४९५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेला २ हजार ७६७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. ब्रोकरेजमध्ये घेण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, कोटक महिंद्रा बँकेला २ हजार ९२५ कोटींचा नफा होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, बँकेने अपेक्षेपेक्षा अधिक नफा कमावल्याचे सांगितले जात आहे. 

कोटक महिंद्रा बँकेने मुंबईत आपली तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांच्यासह अन्य अधिकारी मंडळी उपस्थित होती. खाजगी क्षेत्रातील बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मार्चच्या तिमाहीत ३५ टक्क्यांनी वाढले आहे. आता ही रक्कम ६,१०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न ४,५२१ कोटी रुपये होते. बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन मार्च तिमाहीत ५.७५ टक्के होते, जे संपूर्ण आर्थिक वर्षातील ५.३३ टक्के होते.

मार्चच्या तिमाहीत २२ लाख नवीन ग्राहक जोडले गेले

कोटक महिंद्रा बँकेने मार्च तिमाहीत २२ लाख नवीन ग्राहक जोडले. मार्च तिमाहीअखेर बँकेची एकूण ग्राहक संख्या ४.१२ कोटी होती, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीच्या अखेरीस ३.२७ कोटी होती. कोटक महिंद्रा बँकेची ढोबळ अनुत्पादित मालमत्ता मार्च तिमाहीच्या अखेरीस १.७८ टक्क्यांवर होती. आधीच्या तिमाहीत ती १.९० टक्के होती. बँकेचा निव्वळ एनपीए मार्चच्या तिमाहीत ०.३७ टक्क्यांवर आला, जो मागील तिमाहीत ०.४३ टक्के होता.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स NSE वर १.२८ टक्क्यांनी वाढले. आताच्या घडीला कोटक महिंद्रा बँकेचा शेअर १,९३३ रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या एका महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये ११.५५ टक्क्यांची वाढ झाली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बँकिंग क्षेत्र