Join us

बँक दिवाळखोर झाली तर, किती रक्कम मिळते परत? काय आहे नियम, कसा सुरक्षित ठेवाल पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:39 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईवर बंदी घातली आहे. बँकेत काही गडबड उघडकीस आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईवर बंदी घातली आहे. बँकेत काही गडबड उघडकीस आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक १३ फेब्रुवारी २०२५ पासून कोणतेही नवीन कर्ज वाटप करणार नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. जुन्या कर्जाचं नूतनीकरणही केलं जाणार नाही. या बंदीनंतर बँकेचे ग्राहक आपले पैसेही काढू शकत नाहीत. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर शुक्रवारी बँकांच्या शाखांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रिझर्व्ह बँकेनं कोणत्याही बँकेवर निर्बंध घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मध्यवर्ती बँकेने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरही बंदी घातली होती. इतकंच नाही तर रिझर्व्ह बँकेने यापूर्वी पीएमसी आणि येस बँकेवरही बंदी घातली होती. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या सहकारी बँकांवरही बंदी घातली होती.

बंदी का घातली जाते?

बँकांनी लोकांच्या ठेवींची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बँक या बँकांची चौकशी करते. प्राथमिक चौकशीत काही समस्या आढळल्यास रिझर्व्ह बँक या बँकांवर बंदी घालते. या काळात बँक ग्राहकांचे पैसे काढण्यावर मर्यादा आणू शकते किंवा थांबवू शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहते.

जर बँक अपयशी ठरली किंवा आरबीआयनं त्याचा परवाना रद्द केला तर ग्राहकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये परत मिळतात. बँकेत त्यांचे कोट्यवधी रुपये जमा असले तरी. रिझर्व्ह बँकेनं काही वर्षांपूर्वी, ग्राहकाच्या ठेवीचा विमा पाच लाख रुपयांचा असतो हे स्पष्ट केलं होतं. बँक बुडल्यास ग्राहकाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतात. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) नियमांनुसार या रकमेचा विमा काढला जातो.

जमा होणाऱ्या पैशांचा नियम काय?

समजा तुमच्याकडे एका बँकेच्या खात्यात २ लाख रुपये, त्याच बँकेत २ लाख रुपयांची एफडी आहे, त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यात ३ लाख रुपये आहेत. अशावेळी त्या बँकेत तुमच्याकडे एकूण ७ लाख रुपये जमा आहेत. जर ती बँक बुडली तर तुम्हाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये रक्कम जमा झाली तरीही हाच नियम लागू होतो.

पैसे कसे वाचवायचे?

तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर संपूर्ण रक्कम एका बँकेत ठेवू नका. ही रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करा. समजा तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ८ लाख रुपये जमा आहेत. एका बँकेत ४ लाख तर दुसऱ्या बँकेत ४ लाख रुपये आहेत आणि समजा दोन्ही बँका बुडाल्या, अशावेळी तुम्हाला संपूर्ण ८ लाख रुपये मिळतील. कारण विम्याच्या नियमांनुसार तुम्हाला दोन्ही बँकांकडून पूर्ण रक्कम मिळणार आहे.

या गोष्टीही लक्षात ठेवा

आपले पैसे  सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि मोठ्या खासगी बँकांमध्ये जमा करा. याचं कारण म्हणजे येथे कॉर्पोरेट गव्हर्नन्सची पातळी अधिक चांगली असते आणि नियमही कठोर असतात. एका बँकेत केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम ठेवा. परंतु आपली बचत अनेक बँकांमध्ये जमा करा, जेणेकरून बँक डिफॉल्ट झाल्यावर आपले पैसे सुरक्षित राहतील.

टॅग्स :बँकपैसा