Join us

"मी महाभारतातला 'संजय' नाही," का म्हणाले RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा असं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:15 IST

RBI Sanjay Malhotra: बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीतील निर्णयांची माहिती दिली. यादरम्यान त्यांनी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

RBI Sanjay Malhotra: बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीतील निर्णयांची माहिती दिली. यादरम्यान त्यांनी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यानंतर कर्ज घेतलेल्यांचे आणि नव्यानं कर्ज घेणाऱ्यांचे ईएमआय कमी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्याजदरातील चढ-उताराबाबत कोणतंही भाकीत करण्यास नकार दिला आहे. आपलं नाव संजय असलं तरी आपण महाभारतातले संजय नाही जे भविष्यातील व्याजदरांवर भाष्य करू शकू, असं ते म्हणाले. संजय मल्होत्रा हे एका प्रश्नाला उत्तर देत होते. व्याजदरात आणखी कपात शक्य आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. संजय मल्होत्रा यांनी गव्हर्नरपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे.

मी संजय आहे पण...

विकास आणि महागाईचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पतधोरण काम करत असल्याचेही मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेनंबुधवारी रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करून तो ६ टक्क्यांवर आणला आहे. यावेळी त्यांना भविष्यातील दरांबाबत प्रश्न विचारण्यात आला. "आम्ही रेपो दरात कपात केली आहे. भविष्यासाठी दृष्टीकोनही बदललाय. हा दर कुठपर्यंत पोहोचणार हे आम्हाला माहित नाही. मी संजय आहे, पण मी महाभारतातला संजय नाही की इतक्या दूरवरची भविष्यवाणी करू शकेन. माझ्याकडे त्यांच्यासारखी दिव्य दृष्टी नाही," असं मल्होत्रा उत्तर देताना म्हणाले.

किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात

कर्जदारांना दिलासा

फेब्रुवारीमध्ये पॉलिसी रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पुन्हा व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं (एमपीसी) बुधवारी व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात जाहीर केली. या कपातीनंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आला. फेब्रुवारीमध्ये तो २५ बेसिस पॉईंटच्या कपातीनंतर रेपो दर ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला होता. व्याजदरात कपात केल्यानं गृहकर्जाच्या ईएमआयवरही परिणाम होणार आहे. आता ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसंजय मल्होत्रा