Join us

एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:14 IST

ATM Transaction Failure : जर तुम्हाला एटीएममधून पैसे न मिळताच बँक खात्यातून वजा झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. आरबीआयच्या नियमांनुसार बँकेने पाच दिवसांच्या आत पैसे परत करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला भरपाई मिळेल.

ATM Transaction Failure : एटीएममधून पैसे काढायला गेलात आणि पैसे मिळाले नाहीत, पण तुमच्या बँक खात्यातून मात्र रक्कम वजा झाली, असा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? जर असे तुमच्यासोबत कधी घडले, तर घाबरू नका. काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. आजकाल बहुतांश व्यवहार यूपीआयद्वारे होत असले तरी, एटीएममधून रोख रक्कम काढणे अजूनही सामान्य आहे. पण अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे एटीएममधून पैसे बाहेर येत नाहीत, मात्र खात्यातून रक्कम डेबिट होते. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे, हे जाणून घेऊया.

सर्वात आधी काय करावे?सर्वात आधी एटीएममधून पैसे काढण्याची घाई करू नका. जर एटीएममधून पैसे मिळाले नाहीत किंवा ते अडकले असतील, तर थोडा वेळ थांबा. काहीवेळा मशीनला पैसे बाहेर काढायला वेळ लागतो. जबरदस्तीने नोट खेचण्याचा प्रयत्न करू नका. जर वाट पाहिल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत, तर व्यवहाराची पावती जपून ठेवा. तसेच, तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेजही सुरक्षित ठेवा, ज्यात व्यवहाराची माहिती असते. यासोबतच, एटीएमचा नंबरही नोंदवून ठेवा.

बँकेला द्यावा लागेल दंडरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, जर एटीएममधून पैसे निघाले नाहीत पण खात्यातून कट झाले, तर बँकेला ५ दिवसांच्या आत (व्यवहार झाल्याच्या तारखेपासून + ५ दिवस) ती रक्कम परत करणे बंधनकारक आहे. जर बँक हे पैसे ५ दिवसांच्या आत परत करू शकली नाही, तर बँक तुम्हाला दररोज १०० रुपयांचा दंड देईल, जो पैसे परत मिळेपर्यंत लागू राहील. मात्र, यासाठी तुम्ही बँकेला वेळेत कळवणे आवश्यक आहे.

बँकेशी संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा

  • २४ तास वाट पहा: काहीवेळा बँक स्वतःहून २४ तासांच्या आत पैसे परत करते.
  • ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क: जर २४ तासांनंतरही पैसे परत आले नाहीत, तर लगेच बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. तक्रार करताना एटीएमचे ठिकाण, व्यवहाराची तारीख, वेळ, व्यवहाराचा आयडी आणि पावतीची माहिती द्या.
  • बँकेच्या शाखेत तक्रार: जर ग्राहक सेवा केंद्राकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, तर तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन लेखी तक्रार करा किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करा.

येथे करू शकता तक्रारजर बँक तुमच्या तक्रारीचे निवारण करत नसेल, तर तुम्ही आरबीआयच्या लोकपालाकडे तक्रार करू शकता. आरबीआयच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करता येते.

 

तरीही तुमचे समाधान झाले नाही, तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुमच्याकडे व्यवहाराची पावती, बँक स्टेटमेंट आणि बँकेसोबत झालेल्या संवादाचे पुरावे असावेत. या सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, संयम ठेवा आणि सर्व आवश्यक माहिती सुरक्षित ठेवा.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रएटीएमपैसा