Join us

चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:32 IST

personal loan : अनेकदा आपात्कालीन परिस्थितीत पर्सनल लोन घेण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चांगले वैयक्तिक कर्ज निवडले तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

personal loan : आयुष्यात अनेकवेळा असे प्रसंग येतात की आपल्याला अचानक पैशाची गरज भासू लागते. अशावेळी सहज उपलब्ध होतंय म्हणून लोक पर्सनल लोन घेतात. प्रत्यक्षात वैयक्तिक कर्ज खूप महाग असल्याने सर्व पर्याय संपले तरच हा निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ञ देतात. आता जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचेच असेल तर यामध्येही तुम्ही चांगले आणि योग्य पर्सनल लोन शोधले पाहिजे. त्याची निवड खूप विचारपूर्वक केली पाहिजे. यातून तुम्हाला थोडा दिलासा आणि इतर सुविधा नक्कीच मिळू शकतात. यासाठी ५ मुद्दे तपासले पाहिजेत.

तुम्हाला किती रुपयांचे कर्ज घ्याचे आहे?वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला किती रकमेची गरज आहे ते ठरवा. त्यानंतर, तुम्ही कर्जाची रक्कम आणि कालावधीच्या आधारावर मासिक हप्त्याची तुलना करू शकता. वेगवेगळ्या बँका किंवा वित्तीय संस्थांच्या कर्ज ऑफरची तुलना केल्यास तुम्हाला तुमच्या बजेट आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारे चांगले वैयक्तिक कर्ज निवडण्यात मदत होऊ शकते.

परतफेड कालावधीजेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा त्याच्या परतफेडीचा कालावधी महत्त्वाचा असतो. दीर्घ कालावधीची निवड केल्याने तुमचा मासिक भार कमी होतो. मात्र, कर्जाच्या कालावधीत एकूण व्याज जास्त द्यावे लागते. लहान कालावधी निवडल्याने तुमचा मासिक हप्ता वाढतो. परंतु, व्याज पेमेंटवर बचत होते. त्यामुळे तुमच्यासाठी अधिक योग्य कालावधी निवडा. तुमच्या बजेट आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेनुसार मुदतीचे पर्याय देणारी संस्था निवडा.

व्याजदर खूप महत्वाचावैयक्तिक कर्ज घेताना व्याजदराला प्राधान्य द्या. एकूण कर्जाचा खर्च कमी करण्यासाठी सर्वात कमी व्याजदर मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रतिष्ठित बँका सहसा खाजगी बँका किंवा संस्थांपेक्षा खूपच कमी व्याजदरात कर्ज देतात. सर्वात कमी व्याज दर आणि किमतीचा सौदा शोधण्यासाठी वेगवेगळ्या बँकांनी ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना करा.

किमान कागदपत्रेजेव्हा तुम्हाला त्वरीत पैशांची गरज असते. तेव्हा कादगपत्रांमध्ये खेळण्यात अर्थ नसतो. अनेक बँका किंवा संस्था ऑनलाइन पद्धतीने कमी कागदपत्रांद्वारे कर्ज देतात. bankbazaar नुसार, ओळखीच्या बँका किंवा संस्थांकडून झटपट मंजुरीसाठी पूर्व-मंजूर कर्ज ऑफर शोधा. कर्जाची रक्कम कमी असेल तर लवकर मंजूर होण्याची शक्यता जास्त असते.

प्रक्रिया शुल्कतुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागू शकते. हे शुल्क कर्ज अर्ज हाताळण्याशी संबंधित प्रशासकीय खर्च भरण्यासाठी आकारले जाते. बँक निवडताना त्यांचे प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर या दोन्हींचा विचार करा. कधीकधी कमी व्याजदर देऊन प्रक्रिया शुल्कातून वसूल केली जाते. शक्यतो अशा संस्थांकडून कर्ज घेणे टाळा.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा