Join us

ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:41 IST

ATM Cancel Button Trick: जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी 'कॅन्सल' बटण दोनदा दाबलं तर तुमचा पिन चोरीला जाणार नाही, तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल.

ATM Cancel Button Trick: जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी 'कॅन्सल' बटण दोनदा दाबलं तर तुमचा पिन चोरीला जाणार नाही, तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल. पण यात खरोखर काही तथ्य आहे का की तो फक्त तुमचा भ्रम आहे. ही ट्रिक खरोखर काम करते का?

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेकनुसार, 'कॅन्सल' बटण दोनदा दाबण्याचा पिनच्या सुरक्षिततेशी काहीही संबंध नाही. RBI नं कोणालाही असं करण्याचा सल्ला दिलेला नाही. ही एक प्रकारची फेक ट्रिक आहे आणि लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करावं. खरं तर, २०२२ आणि २०२३ मध्ये असाच एक मेसेज व्हायरल झाला होता, जो खोटा असल्याचं PIB नं म्हटलं होतं. परंतु ही जुनी अफवा पुन्हा पुन्हा पसरते आणि लोकांना ती खरीही वाटते.

जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?

कॅन्सल बटणातं काम काय?

एटीएममधील 'कॅन्सल' बटणाचं एकमेव काम म्हणजे जर तुम्ही व्यवहार सुरू केला असेल आणि तो मध्येच थांबवायचा असेल तर तुम्ही कॅन्सल बटन दाबून प्रक्रिया रद्द करू शकता. परंतु पिन चोरी रोखण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. प्रत्यक्षात, तुमचा पिन चोरीला जाण्याचा धोका स्किमिंग डिव्हाइसेस, छुपे कॅमेरे किंवा तुमच्या मागे उभे असलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे असतो. म्हणून, अशा अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी, काही खबरदारी घेणं महत्वाचं आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

एटीएम वापरताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. पिन टाकताना, कीपॅड तुमच्या हातानं झाकून ठेवा जेणेकरून कोणीही तो पाहू शकणार नाही. एटीएम मशीनमध्ये स्किमरसारखे काही विचित्र उपकरण आहे का ते नीट तपासा. नेहमी असे एटीएम मशीन निवडा जे सुरक्षित ठिकाणी असेल आणि ज्याची स्क्रीन योग्यरित्या काम करत असेल. तुमच्या बँक खात्यात एसएमएस अलर्ट सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्यवहाराची माहिती त्वरित मिळेल. जर तुम्हाला कोणताही अज्ञात व्यवहार दिसला तर ताबडतोब बँकेशी संपर्क साधा.

एटीएम फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सावधगिरी बाळगणं. तुमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका, मग तो मित्र असो किंवा कुटुंबातील सदस्य. दर तीन ते सहा महिन्यांनी तुमचा पिन बदलत रहा आणि १२३४ किंवा जन्मतारीखेसारखे सोपे पिन वापरू नका. जर तुमचं कार्ड हरवले किंवा मशीनमध्ये अडकलं तर ताबडतोब बँकेला कळवा. या छोट्या सावधगिरी तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकतात.

टॅग्स :बँकपैसा