Online Loan Vs Digital Loan : 'सर्वांचं सोंग घेता येतं, पण पैशाचं घेता येत नाही' अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. अनेकदा आपात्कालीन परिस्थितीत कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. सध्या बाजारात विविध प्रकारची कर्जे उपलब्ध आहे. कर्ज मिळवण्याठी पूर्वीसारखे बँकेत खेटे मारावे लागत नाही. तुम्हाला तात्काळ लोन देणारे अनेक पर्याय आहेत. अलीकडच्या काळात डिजिटल फायनान्स अल्पावधीत प्रसिद्ध पावले आहे. तेथे कर्जाचा अर्ज लवकर मंजूर केला जातो. तुम्ही फक्त अॅप डाउनलोड करुन KYC औपचारिकता पूर्ण करायच्या असतात. एक-दोन फोन येतात. तुमच्याकडून काही माहिती घेतली जाते. त्यानंतर काही तासांत रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. मात्र, प्रकार दिसतो तितका आकर्षक नाहीये. तुमची एक चूक आयुष्यभरासाठी पश्चातापाचे कारण होईल.
ऑनलाइन लोन त्रासदायक ठरू नयेतुम्हाला काही तासांतच ऑनलाइन पर्सनल लोन मिळाले. पण, यामुळे भारावून जाऊ नका. कारण, घाईगडबडीत वैयक्तिक कर्ज घेण्याच्या नादात तुमच्या खात्यातून बँकांपेक्षा कितीतरी जास्त दराने व्याज कापले जाईल. याचीही भरपाई तुम्हाला करावी लागेल. या प्रक्रियेत जराही निष्काळजीपणा दाखवला तर कर्ज देताना गोड बोलणारी माणसं उद्धटपणे वागायला सुरुवात करतात. तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता आहे. वसुली एजंट तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. रिकव्हरीसाठी तुमच्याशी गैरवर्तन करण्याचीही शक्यता आहे. आपण दीर्घ कायदेशीर प्रक्रियेत अडकू शकता.
बँकेच्या वैयक्तिक कर्जात अडचण कुठे?आता बँका कमी व्याजाने वैयक्तिक कर्ज देतात. तरी लोक ऑनलाइन कंपन्यांच्या फंदात का पडतात? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्ज देण्यापूर्वी बँका क्रेडिट हिस्ट्री किंवा CIBIL स्कोर तपासतात. या दोन्ही गोष्टी समाधानकारक नसल्यास कर्ज देण्यासही नकार देतात. अशा स्थितीत लोकांकडे दुसरा पर्याय राहत नाही. बँकाही अनेक प्रकारची कागदपत्रे मागतात. सर्व काही सुरळीत झाले तरी वैयक्तिक कर्ज द्यायला आठवडे लागतात. म्हणूनच लोक ऑनलाइन वैयक्तिक कर्जाचा सोपा मार्ग स्वीकारतात. बँकांनी त्यांची प्रक्रिया थोडी सोपी आणि जलद केली, तर ऑनलाइन वैयक्तिक कर्जापेक्षा पारंपरिक वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय आहे.