Join us

'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:25 IST

Deutsche Bank : जर्मन बँक ड्यूश बँक भारतातील आपला किरकोळ व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. रिटेल बँकिंग मालमत्तेसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती.

Deutsche Bank : जर्मनीतील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ड्यूश बँकने (Deutsche Bank) भारतात आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. ड्यूश बँकेने आपला रिटेल बँकिंग व्यवसाय विकण्यासाठी देशी आणि विदेशी बँकांकडून बोली मागवल्या आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या बोलींची अंतिम मुदत २९ ऑगस्ट होती. मात्र, कोणत्या बँकांनी बोली लावली आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

आधीही रिटेल व्यवसाय विकण्याचा प्रयत्नड्यूश बँक सध्या भारतातून आपला रिटेल व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे. बँकेच्या सध्या देशात १७ शाखा आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला बँकेने आपला रिटेल व्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी काही योजनाही तयार केल्या होत्या. मार्चमध्ये बँकेचे सीईओ क्रिश्चियन सिविंग यांनी खर्च कमी करण्यासाठी जवळपास २,००० नोकऱ्या कमी करणार असल्याचे म्हटले होते.

यापूर्वी, २०१७ साली देखील ड्यूश बँकने भारतातील आपला रिटेल आणि वेल्थ मॅनेजमेंट व्यवसाय विकण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर तो प्लान पुढे ढकलण्यात आला होता. सध्या तरी ड्यूश बँकने आपल्या रिटेल व्यवसायाच्या मूल्यांकनाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये बँकेला रिटेल व्यवसायातून २७८.३ दशलक्ष डॉलरचा महसूल मिळाला होता.

इतर विदेशी बँकांनीही कमी केली गुंतवणूकभारत जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि येथे श्रीमंत लोकांची संख्याही वाढत आहे. असे असूनही, स्थानिक बँकांमधील तीव्र स्पर्धा आणि नियामक अडथळ्यांमुळे विदेशी बँकांना भारतात आपला महसूल वाढवणे कठीण जात आहे.

ड्यूश बँकेच्या आधी, सिटी बँकेने देखील २०२२ मध्ये भारतातील आपली गुंतवणूक कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बँकेने आपला क्रेडिट कार्ड आणि रिटेल व्यवसाय विकण्याचा विचार केला होता. गेल्या वर्षी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने ही आपले ४८.८ कोटी डॉलरचे पर्सनल लोन कोटक महिंद्रा बँकेला विकले होते.

वाचा - अमेरिकेसोबत तणावादरम्यान अंबानींचा न्यूयॉर्कमधील मोठा कार्यक्रम अचानक पुढे ढकलला; नेमकं कारण काय?

ग्राहकांवर काय परिणाम होईल?जर एखाद्या नवीन बँकेने ड्यूश बँकेचा रिटेल व्यवसाय खरेदी केला, तर त्याचा थेट परिणाम बँक सेवा धोरण आणि नेटवर्कवर होईल. अशा परिस्थितीत कर्जावरील व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस बदलू शकतात. जर एखाद्या ग्राहकाने ड्यूश बँकेकडून पर्सनल किंवा होम लोन घेतले असेल, तर ते देखील नवीन बँकेकडे ट्रान्सफर होऊ शकते. अर्थात, यासंबंधित प्रत्येक माहिती ग्राहकांना आधीच दिली जाईल. नवीन बँकेसोबतचा तुमचा बँकिंग अनुभव, त्यांची मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंगची पद्धत वेगळी असू शकते. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा