Join us

Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:33 IST

रिझर्व्ह बँकेनं नुकतीच रेपो दरात कपात केली होती. यानंतर आता बँकांनी आपले व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) व्याजदरात कपात केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानं (BOB) रेपो दराशी संबंधित आपल्या प्रमुख व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. याचा फायदा अशा कर्जदारांना होणार आहे ज्यांचे कर्ज या बेंचमार्कशी जोडलेलं आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेल्या कपातीच्या अनुषंगाने बँकेनं ७ जूनपासून रेपो लिंक्ड लोन रेट (RLLR) ०.५० टक्क्यांनी कमी केला आहे.

बीओबीकडून ग्राहकांना पूर्ण लाभ

बँक ऑफ बडोदानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा आरएलएलआर आता ८.१५ टक्के झालाय. रिझर्व्ह बँकेच्या आरएलएलआरमधील कपातीची बीओबीनं पूर्णपणे अंमलबजावणी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन एमसीएलआर दर ७ जूनपासून लागू झालाय. या कपातीमुळे एक दिवस आणि एक महिन्याचे व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी होऊन ८.९० टक्क्यांवर आले आहेत. तीन महिन्यांचा व्याजदर ०.१० टक्क्यांनी घसरून ८.९५ टक्क्यांवर आला आहे. सहा महिने आणि एक वर्षाचा व्याजदर ०.१० टक्क्यांनी घसरून ९.०५ टक्क्यांवर आला आहे. दोन वर्षे आणि तीन वर्षांच्या कर्जाचा व्याजदर पूर्वीच्या ९.२० टक्क्यांवरून ९.१० टक्के करण्यात आला आहे.

रेपो रेट ५.५० टक्क्यांवर

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी व्याजदरात अपेक्षेप्रमाणे ०.५० टक्क्यांची कपात केली आणि बँकांना कर्ज देण्यासाठी अधिकाधिक पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी अनपेक्षितपणे रोख राखीव गुणोत्तरात कपात केली. यावेळी आरबीआयनं थेट रेपो दरात ५० बेसिस पॉईंट म्हणजेच ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. या ताज्या निर्णयानंतर आता रेपो दर ६.०० टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आला आहे.

टॅग्स :एचडीएफसीबँक