Join us

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एक अटक; विकासकाने खाल्ले ७० कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:36 IST

New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी माजी जनरल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

New India Co-operative Bank Scam: ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजत असलेला 'लकी भास्कर' चित्रपटाची स्क्रिप्ट शोभावी अशी घटना मुंबईतच घडली आहे. साधा क्लर्क ते जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचलेल्या व्यक्तीने  बँकेला तब्बल १२२ कोटी रुपयांना गंडा घातला आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत हा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका विकासकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या विकासकाचे नाव धर्मेश पौन असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी बँकेचा माजी जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक करण्यात आलं आहे.

या प्रकरणातील १२२ कोटी रुपयांपैकी ७० कोटी रुपये धर्मेशने घेतल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की मुख्य आरोपी जनरल मॅनेजर हितेश मेहता यांच्याकडून धर्मेशला मे आणि डिसेंबर २०२४ मध्ये १.७५ कोटी रुपये आणि जानेवारी २०२५ मध्ये ५० लाख रुपये मिळाले. याप्रकरणी काल पोलिसांनी दीर्घ चौकशीनंतर हितेश मेहताला अटक केली.

मुख्य आरोपी हितेश मेहताला अटकन्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता याला अटक केली. त्याच्यावर १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील व्यवहारांवर १३ फेब्रुवारी रोजी अनेक निर्बंध लादले. याचा तोटा सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावे लागत आहे.

२०२० ते २०२५ झाला घोटाळा२०२० ते २०२५ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँकेच्या एका अधिकाऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेला माहिती दिली की बँकेच्या खात्याच्या वह्या आणि रोख रकमेत अनियमितता आढळून आली आहे. दादर आणि गोरेगाव शाखेतून अनियमितपणे पैसे काढल्याचे तपासात उघड झाले असून, त्यामागे हितेश मेहताचा हात असल्याचे सांगण्यात आले आहे.

कसा केला घोटाळाआरोपी माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता हा दोन शाखांचा प्रमुख होता. त्यामुळे बँकेतील तिजोरी त्याच्याच ताब्यात होती. तो बँकेतून पैसे काढून बाहेर नातेवाईक आणि व्यावसायिकांना वाटत असल्याचे तपासून समोर आले आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून तो रटिस्टरवर याची नियमित नोंद करत होता. जर आरबीआयने रोख नोटा मोजल्या नसत्या तर हा घोटाळा कधीच बाहेर येऊ शकला नसता.

ग्राहकांना मोठा धक्काबँकेच्या व्यवहारांवर आरबीआयने निर्बंध लादल्याने ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आरबीआयचा आदेश येईपर्यंत बँक यापुढे कोणतेही नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा ग्राहकांकडून नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे १.३ लाख खातेदारांना त्यांचे जमा केलेले पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. ठेवीदारांना दिलासा मिळावा यासाठी बँक पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रगुन्हेगारीमुंबई