ये है मोबाइल मेरी जान; गर्दीतही दिलासा देणारा सखा बनलाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 02:58 AM2018-09-02T02:58:50+5:302018-09-02T02:58:54+5:30

पहिल्यांदाच मुंबईला येणाऱ्या व्यक्तीच्या अनेक भावनिक प्रतिक्रिया असतात. कोणी मुंबईच्या उत्तुंग इमारती किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघून भारावून जातात; कोणी येथील मरणाची गर्दी बघून धास्तावतात; कोणी मरिन ड्राइव्ह बघून प्रेमात पडतात तर कोणी झोपडवस्त्या बघून दुसरीकडे नजर वळवतात.

This is my mobile; Even a crowd of happy people ... | ये है मोबाइल मेरी जान; गर्दीतही दिलासा देणारा सखा बनलाय...

ये है मोबाइल मेरी जान; गर्दीतही दिलासा देणारा सखा बनलाय...

Next

- सुलक्षणा महाजन

पहिल्यांदाच मुंबईला येणाऱ्या व्यक्तीच्या अनेक भावनिक प्रतिक्रिया असतात. कोणी मुंबईच्या उत्तुंग इमारती किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघून भारावून जातात; कोणी येथील मरणाची गर्दी बघून धास्तावतात; कोणी मरिन ड्राइव्ह बघून प्रेमात पडतात तर कोणी झोपडवस्त्या बघून दुसरीकडे नजर वळवतात. मुंबईमध्ये चालताना, पळताना, बघताना भावनांच्या असंख्य लाटा नकळतपणे प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणूनच मुंबई नाट्यमय वाटते. अनेक जण या नाटकात सामील असतात तर काही जण मात्र मुंबईमध्ये या भाव-भावनांच्या आवर्तनातून स्फूर्ती मिळवतात. मुंबई रोज घडत असते, बिघडत असते आणि प्रत्येकाला घडवत असते. घडण्या-बिघडण्याचा हा खेळ बहुरंगी आणि बहुढंगी असतो. मुंबईच्या अवकाशातील या नाट्यानुभावामुळे मानवी बुद्धीला, सर्जनशीलतेला, कला आणि संस्कृतीलाही येथे धुमारे फुटतात. कवी, लेखक, चित्रकारांना स्फूर्ती मिळते. त्याचेच प्रतिबिंब ‘ये है मुंबई मेरी जान’ या जॉनी वॉकरच्या गाण्यावर पडून ते मुंबईला अजरामर करते.
साठ-सत्तरच्या दशकात अनुभवलेली मुंबई म्हणजे विशाल बहुविध कला केंद्रच होते. तेव्हा एकट्या दक्षिण मुंबईत २०-२५ सिनेमागृहे असतील. हॉलीवूड-बॉलीवूड यांचा येथे संगम होता. सिनेमा ही मुंबईची आशा, भाषा आणि करमणूक होती. मेट्रो, रीगल, इरॉस, लिबर्टी, इम्पिरियल इंग्रजी सिनेमासाठी तर स्वस्तिक, नाझ, हिंदमाता, अप्सरा ही सिनेमागृहे हिंदी-मराठी सिनेमांसाठी प्रसिद्ध होती. येथे सत्यजीत रे यांचे बंगाली तसेच तमिळ, कन्नड भाषेतील सिनेमे बघायला मिळत. अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध ऐन भरात होते तरी येथे मात्र दोन्ही देशांतील उत्तम सिनेमे बघायला मिळत. चित्रा सिनेमागृहात फिल्म सोसायटीमुळे जगभरातील सिनेमे बघायला गर्दी होत असे. गिरगावातल्या साहित्य संघ मंदिरात आणि दादरच्या शिवाजी मंदिरात उत्तम नाटके होत. अनेक प्रकारच्या देशी-परदेशी नृत्यांचे कार्यक्रम म्हणजे मेजवानी असे.
१९७० च्या दशकात घोळक्याने अशा कार्यक्रमांना जाणे हा आम्हा सर्व कॉलेजच्या मुलामुलींचा मोठा छंद होता. सिनेमा बघणे, त्यावर चर्चा करणे, नायक-नायिकांच्या प्रेमाने वेडे होणे, सिनेमातील गाणी-संगीत ऐकणे आणि संवाद फेकणे सतत चालू असे.
नव्यानेच बाजारात आलेला ट्रान्झिस्टर तेव्हा तरुण-तरुणींचा जिवलग सखा होता. कानाला लावून हिंडणारे अनेक जण रस्त्यावर, बस आणि रेल्वेमध्ये दिसत. रेडिओवरील विविधभारती आणि अमीन सयानी यांच्या बिनाका गीतमालेचा तो सदाबहार काळ होता. सिनेमा, नाटक, संगीताचे कार्यक्रमही समूहाने एकत्र येऊन आस्वाद घेण्याची करमणूक होती. साहजिकच सिनेमा-नाट्यगृहे कायम हाउसफुल्ल असत आणि तिकिटांचा काळाबाजार जोमात असे. आज हे सर्वच इतिहासजमा झाले आहे. प्रेक्षकांच्या अभावी सिनेमा-नाट्यगृहे ओस पडून आहेत. गोविंदा आणि गणपती उत्सव इतकीच सामूहिक करमणूक मुंबईत उरली असली तरी राजकीय स्पर्धेमुळे त्याचा सार्वजनिक त्रास जास्त आणि आनंद मात्र कमी झाला आहे.
१९७० च्या दशकानंतर मुंबईच्या सामूहिक आणि सार्वजनिक करमणुकीचे स्वरूप प्रथम टेलिव्हिजनने आणि अलीकडे मोबाइलने पूर्णपणे बदलून टाकले. करमणूक तर सामूहिक किंवा कौटुंबिक न राहता संपूर्णपणे व्यक्तिकेंद्री झाली आहे. घरातला भिंतीवरचा लहान पडदा आणि हाताच्या मुठीतल्या मोबाइलची करमणूक यांनी लोकांची बोलतीच बंद केली आहे.
मोबाइल हा आता मुंबईच्या धकाधकीच्या आणि एकाकी आयुष्याचा ताईत झाला आहे. मोबाइल आणि त्याच्या दोन बारीक वायरी कानात घातल्यानंतर प्रवास करताना दूरच्या मित्र-मैत्रिणीशी संभाषण नाहीतर मोबाइलच्या पडद्यावर करमणूक सुरू होते. मुंबईतल्या बेभरवशाच्या प्रवासाचा मोबाइल हा साथीदार बनला आहे. तो डोळे,
हात आणि कान यांचे आवश्यक
साधन झाला आहे. तो लोकलच्या गर्दीतही दिलासा देणारा सखा आहे; ड्रायव्हर लोकांना तो दिशा दाखवतो आणि हरवलेल्यांना बरोबर ठिकाणी पोहोचवतो. मोबाइलमुळे हवी ती करमणूक, हवा तो चॅनेल बघण्याची आणि हव्या त्या माणसाशी गप्पा मारण्याची सोय झाली आहे.
कोठेही, कोणत्याही कारणाने वाहतूक ठप्प झाली तरी मोबाइल मात्र चालूच राहतात
आजकाल मुंबईकर नेहमी भयग्रस्त असतो आणि हे भय दूर करायला मुठीतला मोबाइल मदत करतो. एकेकाळी मुंबई ही जॉनी वॉकरचीच नाही तर सर्वच मुंबईकरांची जान होती. आता मोबाइल हाच मुंबईकरांचा प्राण आणि प्राणवायू बनला आहे.

Web Title: This is my mobile; Even a crowd of happy people ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.