अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, चालू आठवडाभर गारठा कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.
उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरू असून, त्याचा परिणाम विदर्भासह अकोला जिल्ह्यावर होत आहे. वातावरणात काहीसे ढगाळपणाही जाणवत आहे.
रविवारी अकोल्याचे किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर आगामी काही दिवसांत कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरण असले तरी पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहाटे दाट धुके; दुपारी थोडा दिलासा
पहाटेच्या सुमारास थंडी अधिक तीव्र होत असून, अनेक भागांत दाट धुक्याचे वातावरण दिसून येत आहे. यामुळे पहाटेच्या वेळी वाहनचालकांना काळजी घ्यावी लागत आहे. मात्र दुपारनंतर सूर्यप्रकाश वाढत असल्याने गारठ्यात काहीसा दिलासा मिळत असल्याचे जाणवत आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत किमान तापमानात चढ-उतार संभवतो, मात्र एकूणच थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेतीवरही परिणाम
हवामानातील या बदलाचा परिणाम शेतीवरही दिसून येत आहे. काही भागांत कापूस व भाजीपाला पिकांवर थंडीचा परिणाम जाणवत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.