Join us

Weather Update: वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, ३ ठार, जनावरेही दगावली, कुठे काय नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 9:26 AM

मुसळधार पावसाने काल मराठवाड्यातील विविध ठिकाणी हैदोस घातला. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

लातूरमधील  चाकूर तालुक्यातील महाळंगी येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा तडाखा संपूर्ण गावाला बसला. विजेच्या ट्रान्सफॉर्मरसह झाडे उन्मळून पडली. वीज पडून दोघा शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. गावात अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे बळीराम व्यंकट हणमंते (वय ३५) यांच्या अंगावर झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महाळंगी येथील शिवाजी नारायण गोमचाळे (३०) व ओमकार लक्ष्मण शिंदे (३५) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास महाळंगी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. यावेळी शिवाजी नारायण गोमचाळे व ओमकार लक्ष्मण शिंदे हे शेतकरी शेतात काम करत होते. यावेळी वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा संपूर्ण गावाला बसला आहे. त्यामुळे विद्युत खांब जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर विजेचे ट्रान्सफॉर्मरही पडले. शिवाय अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यात एक ऑटो, ट्रॅक्टरचेही नुकसान झाले असून, अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

वीज पडून शिवाजी गोमचाळे, ओमकार शिंदे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मृत शिवाजी गोमचाळे यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, तर ओमकार शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी व चार मुली, असा परिवार आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात आणि लातूर तालुक्यातील चिंचोली व. येथे रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडला. तसेच झाडेही उन्मळून पडली.

दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन तापमान वाढले आहे. त्यामुळे जीवाची कासावीस होत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी अचानकपणे जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला औराद शहाजानीसह तगरखेडा, हालसी, सावरी, शेळगी, हलगरा आदी गावांत पावसाला सुरुवात झाली

घर, वाहनांवर झाडे कोसळली

महाळंगीत वादळी वाऱ्याचा वेग भयानक होता. अनेक लोक वादळामुळे घाबरले होते. काही क्षणांतच अनेकांच्या घरांवरील पत्रेही उडाले. लखन सोळुंके यांच्या ऑटोवर झाड पडल्याने नुकसान झाले आहे, तसेच एक वडाचे झाड ट्रॅक्टरवर उन्मळून पडल्याने चालक किरण सोळंके यांच्या हाताला दुखापत झाली आहे. बशीर सय्यद यांच्या किराणा दुकानावर झाड पडल्याने दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. २०० झाडे, १९ विद्युत खांब उखडले म हाळंगी शिवारात वादळी वाऱ्याने जवळपास २०० हून अधिक झाडे उन्मळून पडलीआहेत, तसेच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने १९ विद्युत खांबही उखडले आहेत, तसेच दोन डीपीही पडल्या आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, गोठ्यात बांधण्यात आलेल्या जनावरांवर पत्रे पडून त्यांना दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी अनुपमा निबाळकर, तलाठी विष्णू वजिरे यांनी महाळंगी गावात भेट देऊन पाहणी केली. या वादळी पावसात सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.चार म्हशीही दगावल्या

निलंगा तालुक्यातील शेळगी येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची एक म्हैस, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हालकी येथील गंगाधर माधवराव बामणकर यांची एक म्हैस, लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील ईश्वर सराफ, काटगाव (कृष्णानगर तांडा) येथील विठ्ठल राठोड यांची प्रत्येकी एक, अशा चार म्हशी वीज पडून रविवारी दगावल्या आहेत.

टॅग्स :पाऊसलातूरनिलंगाहवामान