Join us

कष्टाने शेत बहारले पण अवकाळीने हिरावले; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:42 AM

संत्रा, कांदा शेतात झाला आडवा, झाडे उन्मळून पडली, हळदही पूर्णतः भिजली; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी

खरीप व रबी हंगामात एक ना अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यातून सावरत शेतकन्यांनी उन्हाळी ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, तीळ आदी पिकांची पेरणी केली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची कमरता असली, तरी उन्हाळी पिके बहुतांश ठिकाणी चांगली बहरली आहेत. आता थोडाबहुत आधार मिळेल, या आशेवर शेतकरी होता, परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

आंबा, हळदीचे झाले नुकसान

सवना परिसरात  मंगळवारी मध्यरात्री आलेल्या वादळवारे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा, संत्रा या फळबागांसह हवादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सवना, सवना तांडा, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा व सूरजखेडा या भागांत हळद काढणीचे काम सुरू आहे. परंतु दोन आठवड्यांपासून अधूनमधून येणारा अवकाळी पाऊसवादळामुळे शेतकऱ्यांची हळद भिजून जात आहे. हळद वाळवायला ठेवली की अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले, मंगळवारी मध्यरात्री वादळवारे झाले. यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले.

या वादळामुळे रस्त्यावरील व शेतातील झाडे उन्मळून पडली. दुसरीकडे संत्रा, आंबा या फळांचेही नुकसान झाले. यावर्षी आंबा चांगला बहरला होता: परंतु वादळामुळे आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामातील नुकसानीची आर्थिक मदत काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यात पुन्हा अवकाळीने नुकसान केल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे.

गोरेगाव परिसरात वादळामुळे आंब्यांचे नुकसान

■ सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरात मंगळवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान अवकाळी पाऊस व वादळीवारे आले. या वादळात हळदीसह आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडाखाली आंब्यांचा सडा पडला होता.

■ मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या वादळ वाऱ्यांसह सलग तासभर मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. वादळामुळे घरावरील पत्रे, दुकानांची फलके उडाली. अनेक ठिकाणी शेतात व रस्त्यावर झाडे म्हणून पडली. तसेच जनावरांच्या वैरणीसह व हळदीवरील ताडपत्र्या उडाल्या.

■ त्यामुळे हळदीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, गोरेगाव येथील वामन रामभाऊ खिल्लारी यांच्या शेतात वीज कोसळल्याने एक बैल जागीच दगावला. जवळपास ८५ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. तर अनिल किसन बांगर यांच्या शेतातील सौर पॅनलचे वादळी वार्‍याने नुकसान झाले.

तसेच डिग्रस कन्हाळे वादळवारे व अवकाळी पावसामुळे हिंगोली तालुक्यातील डिग्रस व परिसरातील अनेक शेतशिवारात उन्हाळी तिळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

टॅग्स :पाऊसवादळपीकशेतीशेतकरी