Join us

टंचाई झळा तीव्र! जायकवाडी धरणात आता उरलंय केवळ एवढं पाणी

By मुक्ता सरदेशमुख | Updated: February 21, 2024 15:00 IST

राज्यातील धरणांचा साठा वेगाने खालावल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सियसच्याही पुढे गेले असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान, राज्यातील धरणांचा साठा वेगाने खालावल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ २९.२८टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ८९.८७ टक्के शिल्लक होता. म्हणजेच सुमारे  ६०.५९ टक्के पाण्याची तूट यंदा आहे.

आज दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८च्या सुमारास जायकवाडी धरणात केवळ ६३५.६७ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.राज्यातील एकूण २९९४ लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आज ४८.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मराठवाडा किंवा औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये केवळ २६.३५ टक्के एवढा राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

राज्यात बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत. 

जाणून घ्या कोणत्या विभागात किती पाणी...

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीमराठवाडा