Join us

temperature: तापमानाने ओलांडली चाळिशी, देशभर लाहीलाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 10:46 IST

महाराष्ट्रात ४० अंशांच्या वर तापमान, अंगाची लाही लाही अन् घामाच्या धारांनी नागरिक बेजार

महाराष्ट्रभर उन्हाचे चटके बसत असताना उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या अनेक भागांत अनेक जिल्ह्यांत तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. प. बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक या राज्यांत २६ एप्रिलपर्यंत तापमानात वाढ होत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण पश्चिम बंगालमध्ये किमान ३० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात कलाईकुंडा येथे तापमान ४४.७ इतके नोंदले गेले.

■ ओडिशात शुक्रवारी १२ ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. औद्योगिक शहर अंगुल येथे राज्यातील सर्वाधिक तापमान ४४.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

■ नवी दिल्लीत शुक्रवारी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

महाराष्ट्रात ४० पार!.

महराष्ट्रात तापमान ४० पार जात असून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रही वाढत्या उष्णतेमुळे हैराण आहे. सध्या कोकण व किनारपट्टीच्या भागात उष्ण व आर्द्र हवामानाची नोंद करण्यात आली असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी दिवसभर तापमान उच्चांकी असल्याचे पहायला मिळत असून संध्याकाळी हल्यक्या ते मध्यम सरींचा पाऊस होत आहे. घामाच्या धारांनी नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असून महाराष्ट्रासह देशभरात तापमान वाढत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :तापमानहवामान