Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, पण पुरेशा पावसानंतरच पेरण्या करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:06 IST

मॉन्सून राज्यात आला असला, तरीही अनेक ठिकाणी पेरण्या होतील इतपत म्हणजे ७५ ते १०० से.मी. पाऊस पडलेला नाही.

मॉन्सूनने राज्य व्यापले असले तरी पेरणीसाठी म्हणावा तसा पाऊस राज्यातील अनेक ठिकाणी अजूनही झालेला नाही. जोपर्यंत ७५ ते १०० से.मी. पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. तूर, उडीद, भुईमूग वगळता १५ जुलैपर्यंत पेरणी करता येईल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी मौसम विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज दुपारी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत राजस्थान, हरियाणा व पंजाबमधील उर्वरित भागात मॉन्सून सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. पुढील दोन दिवसात अनेक ठिकाणी मध्यम ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरातील काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान मराठवाडयात दिनांक  29 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 30 जून व 01 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाडयात दिनांक 30 जून ते 06 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे.

असे असले तरीही सध्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने हा सल्ला दिला आहे.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊसखरीपपेरणीशेतकरी