Join us

Rain: राज्यभर मुसळधार, विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 21, 2023 17:28 IST

आज आणि उद्या राज्यात पाऊस सक्रीय

राज्यात आज व उद्या जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला असून आज विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून बहुतांश राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल झारखंडच्या दक्षिण पूर्व भागात व उत्तर प्रदेशच्या दक्षिण पश्चिमी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किमी अंतरावर होता. सध्या मान्सून दक्षिणेकडून त्याच्या मूळ स्थानापर्यंत आला आहे. दोन ते तीन दिवसात मान्सूनचे वारे उत्तरेकडे सरकतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात पाऊस सक्रिय राहणारा असून कोकण मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज विदर्भातील पाच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नंदुरबार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर वगळता उर्वरित राज्याला जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांना विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, आज सकाळपासून नाशिकमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती.

यावेळी 45 ते 55 किमी प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग राहणार असून दक्षिण पश्चिम ते मध्य पश्चिम अरबी समुद्राच्या दिशेने 65 किमी प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग असेल. यामुळे बंगाल ओडीसा किनारपट्टीवर तसेच गुजरात किनारपट्टीच्या अरबी समुद्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मासेमाऱ्यांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या (22 सप्टेंबर 2023) बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट कुठे?

रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, पुणे, सातारा, धाराशिव, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, भंडारा

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज