Join us

Monsoon Update मॉन्सूनच्या वाटचालीस देशात पोषक वातावरण; पुढील दोन दिवसात कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:25 AM

मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये शुक्रवारी (दि.२४) प्रगती झाली असून, तो पुढे सरकला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासालाही पोषक वातावरण असून, कोणताही अडथळा येणार नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

पुणे : मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये शुक्रवारी (दि.२४) प्रगती झाली असून, तो पुढे सरकला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासालाही पोषक वातावरण असून, कोणताही अडथळा येणार नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यात ४५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

सध्या मॉन्सून मालदीव आणि कोमोरिन भाग, तसेच श्रीलंका, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भागात आणि अंदमान समुद्राचा आणखी भागात पोहोचला आहे. तसेच अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापला आहे.

मॉन्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झालेली आहे. कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकत आहे. हे क्षेत्र ईशान्येकडे सरकत राहण्याचा अंदाज असून २५ मे रोजी सकाळी या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तर रात्रीपर्यंत याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळामध्ये होऊ शकते. दक्षिण केरळमध्येही चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

विदर्भ, मराठवाड्यात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक तर खानदेशातील जळगाव, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

राज्यामध्येही पुण्यासह तापमानात वाढ होत आहे. पुणे येथे कमाल तापमान ३७.६ नोंदविण्यात आले. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांपुढे होता. उन्हाळ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. मराठवाड्यातही तापमान वाढले होते. उकाड्याने नागरिक त्रस्त होते.

अकोला सर्वाधिक उष्णराज्यामधील कमाल तापमानात याद होत असून, सर्वाधिक उष्ण शहर अकोला ठरले. येथे ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोट आली तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान ४४ अंशावर गेल्याने उष्णतेच्या लाटेचा अनुभव नागरिकांना आला. मराठवाड्यातील तापमानही चांगले तापू लागले आहे.

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजहवामानतापमानपाऊस