Join us

मान्सून आला रे! नैऋत्य मोसमी पावसाचा कसा असणार प्रवास? हवामान विभागाने सांगितले..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 9:44 AM

मोसमी पाऊस अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात रविवारी दाखल झाला.

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने रविवारी (दि. १९) निकोबार बेटांवर धडक दिली. मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

'ला नीना' च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी 'अल निनो' सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत 'ला निना'ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल व विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल.

उत्तर भारतात उष्णतेची लाट

देशातील अनेक राज्यांत सध्या कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. काही ठिकाणी तर पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीसह, पंजाब, हरयाणा चंडीगडसह राजस्थानच्या काही भागांत पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय गुजरात, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशचा काही भाग, बिहारच्या काही भागांतही कमाल तापमान वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामान