Pune : महाराष्ट्रातील विविध भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आणखी परतीच्या पावसाने हजेरी लावली नसली तरीही छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांसोबत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाला पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून पीके वाहून गेली आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं होतं. ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत होते. काल आणि आजपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा विदर्भामध्ये स्थित होता. त्यामुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आणि कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. पण हवेतील चक्रीय स्थिती तशीच आहे. त्यामुळे आज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडत आहे.
पाऊस कधी थांबणार?सह्याद्री घाट माथा, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगरमध्ये खूप जास्त पाऊस झाला असून येणाऱ्या २४ तासापर्यंत पावसाची ही तीव्रता अशीच राहणार आहे. तर येणाऱ्या २४ तासानंतर पावसाचा जोर कमी होईल. म्हणजे १६ सप्टेंबरच्या संध्याकाळनंतर पावसाचा जोर आसरेल अशी माहिती हवामान विभागाने दिली असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
भारतात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून पश्चिम राजस्थानमधून पावसाने माघार घेतली आहे. तर सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील परतीचा पाऊस हा ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान पडतो. राजस्थानमधून परतीचे वारे गेल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसांत महाराष्ट्रातून ते निघून जातात. म्हणून यावर्षी महाराष्ट्रातील परतीचा मान्सून पाऊस पुढे ढकलण्याची शक्यता आहे.