Join us

Maharashtra Weather Update : आता दव, धुके जाणवणार नाही, कसे असेल महाराष्ट्रातील हवामान? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:09 IST

Maharashtra Weather Update : संपूर्ण महाराष्ट्रात थंडीत वाढ होत असल्याची माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 

Maharashtra Weather Update :  मागील काही दिवस वातावरण चांगलेच बदलल्याचे दिसून आले. मात्र कालपासून थंडीत चांगलीच वाढ झाली असून किमान तापमानात घसरण दिसून आली. आज नाशिक शहराचे (Nashik Temperature) तापमान 10.1 अंश नोंदवले गेले तर निफाडचे तापमान 07.3 अंश नोंदविण्यात आले. तर संपूर्ण महाराष्ट्रात थंडीत वाढ होत असल्याची माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.               किमान तापमान -                     काल शुक्रवार दि. ३ जानेवारीपासुन पहाटेचे किमान तापमानात (Temperature) घसरण होत असुन, आज संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके तर भाग परत्वे बऱ्याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडे तीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. आज तर जळगांव, नगर, पुणे, नागपूर शहरातील पहाटेचे किमान तापमान तर एकांकी संख्येवर पोहोचले आहे. कोकणात सुद्धा डहाणू, मुंबई, सांताक्रूझ येथेही सरासरीपेक्षा अर्ध्या डिग्रीने किमान तापमान खालावले आहे. 

कमाल तापमान -                                     या उलट दुपारी ३ चे कमाल तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात भाग परत्वे सरासरीपेक्षा एक डिग्रीपासून ७ डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवसा ऊबदारपणा तर रात्री थंडी जाणवत आहे.                      आर्द्रता -                           आज सकाळची सापेक्ष आर्द्रता ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात डहाणू, सांताक्रूझ, नगर, सोलापूर वगळता भाग परत्वे सरासरीपेक्षा एक पासून २९ टक्क्यापर्यंत खालावली असल्यामुळे, हवेतही त्यामानाने कोरडेपणा असुन पहाटे पडणारे दव, धुके ही विशेषकरून जाणवणार नाही, असे वाटते. त्यामुळे एकूणच हे वातावरण रब्बी पिकास अत्यंत लाभदायक ठरु पाहत आहे. सध्या पुढील १५ दिवस तरी म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यन्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. तोपर्यंत चांगल्या लाभदायक थंडीची अपेक्षा करू या!               

- माणिकराव खुळे,Meteorologist (Retd.),IMD Pune.

टॅग्स :हवामानशेतीशेती क्षेत्रतापमान