Join us

Nashik Rain Alert : नाशिकसाठी दोन दिवसांचा 'यलो अलर्ट', जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:51 IST

Nashik Rain Alert : येत्या गुरुवारी हवामान विभागाकडून नाशिकसाठी दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

नाशिक : शहर व परिसरात मे महिन्यात विक्रमी १८७ मिमी इतका पाऊस पडला. बेमोसमी पावसाने (Avkali Paus) शहरासह जिल्ह्यातला जोरदार तडाखा दिला होता. मान्सूनने नाशिकमध्ये (Nashik Rain alert) प्रवेश अद्याप केलेला नाही. येत्या गुरुवारी हवामान विभागाकडून नाशिकसाठी दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस (Monsoon rain) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नाशिक शहर व परिसरात मागील गुरुवारपासून पावसाने विश्रांती घेतली. आहे. बुधवारी २१ मिमी इतका पाऊस पडला होता. यानंतर पावसाने उघडीप दिली. आकाशदेखील निरभ्र झाले. तसेच सूर्यप्रकाशदेखील पुरेशा प्रमाणात शहरात पडत आहे. कमाल तापमान ३१ अंशांच्या पुढे तर किमान तापमान मंगळवारी २३.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. 

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वातावरणात उष्मा व उकाडा वाढला असून, काही प्रमाणात तरी उन्हाळा अनुभवयास येत आहे. मान्सूनने जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला असून, ५ जून रोजी म्हणजेच दरवर्षीप्रमाणे वेळेवर होण्याची शक्यता आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यास पेरणीसाठी बळीराजाला अधिक पोषक वातावरण तयार होण्यास मदत होईल. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मान्सूनची वाटचाल थांबलेलीनाशिकमध्ये मान्सून दाखल होण्यास अजूनही पोषक असे वातावरण नाही. मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचलेला मान्सून तेथेच खिळून राहिलेला आहे, अशी माहिती हवामानशास्त्र अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली. मान्सून ऊर्जितावस्थेत येण्यासाठी कुठलीही वातावरणीय प्रणाली तयार झालेली दिसत नाही.

यामुळे मान्सूनची वाटचाल सध्यातरी वेगवान नाही. पुढचा टप्पा हा अहिल्यानगर, नाशिक असाच राहणार आहे. मात्र त्यासाठी अजून किमान आठवडाभर तरी नाशिककरांना मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेही खुळे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रशेतीमोसमी पाऊस