Join us

Vidarbh Weather Update : विदर्भात पारा काहीअंशी घटला, आता आठवडाभर वादळवाऱ्याशी गाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 12:10 PM

विदर्भातील जिल्ह्यांत ४४ अंशावर असलेला पारा त्याखाली आला असला तरीही पण उन्हाच्या झळा जाणवत आहेत.

अकोला : सोमवारी विदर्भातील जिल्ह्यांचे कमाल तापमान अंशतः खाली आले खरे पण उष्णतेच्या झळांनी आजही नागरिकांची होरपळ केली. रविवारी अकोल्यासह अनेक शहरांत ४४ अंशावर असलेला पारा त्याखाली आला असला तरीही पण उन्हाच्या झळा जाणवत आहेत. 

दरम्यान आज ७ मे पासून अकोल्यासह बहुतेक जिल्ह्यांत वादळ वाऱ्याचे सावट असून, उन्हापासून थोडा दिलासा मिळेल, असा वैधशाळेचा अंदाज आहे. सोमवारी केवळ ब्रह्मपुरीचे तापमान वधारले व विदर्भात सर्वाधिक ४४.१ अंशाची नोंद येथे झाली. इतर शहरांतील तापमान मात्र अंशतः कमी झाले. रविवारी ४४ अंशाच्या वर असलेला अकोला, वर्धा, चंद्रपूरचा पारा २४ तासांत त्या खाली येत अनुक्रमे ४३.७, ४३.५ व ४३.६ अंशावर उतरला. इकडे नागपूरचे तापमानही ४३ अंशावरून ४२.६ अंशावर खाली आले. याशिवाय यवतमाळ, गडचिरोलीत ४२, गोंदिया ४१.४ अंशाची नोंद झाली.

दरम्यान तापमान खाली आले असले तरी उन्हाच्या चटक्यांची तीव्रता तेवढीच होती. दुपारी घराबाहेर पडल्यावर शरीराला झळा बसत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांनी ऊन वाढण्यापूर्वी कार्यालय गाठण्यावर भर दिला. रविवारी नीट परीक्षेमुळे रस्त्यावर असलेली गर्दी दिसली नाही. बहुतेक वर्दळीच्या रस्त्यांवर दुपारनंतर शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, हवामान विभागाने ७ मेपासून १२ मेपर्यंत विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

कमाल तापमानात होणार घट

अकोला, अमरावती, भंडारा, व वाशिम जिल्ह्यांत मात्र ७ मे रोजी उन्हाच्या झळा बसणार आहेत. उर्वरित नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत मात्र मंगळवारपासूनच सोसाट्याचे वादळ, विजांचा कडकडाट व काही ठिकाणी हलका पाऊस होण्याचीही शक्यता आहे. हे वादळवाऱ्याचे सावट आठवडाभर राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमाल तापमान काही अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भात आठवडाभर ढगाळ वातावरणाची शक्यता, वाचा सविस्तर हवामान अंदाज

टॅग्स :हवामानविदर्भशेतीतापमानगारपीट