Join us

गाळमुक्त धरणासाठी मदत करा आणि करसवलत मिळवा, नाशिक प्रशासनाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 2:39 PM

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्ध नाशिक अभियान सुरू करण्यात आले.

नाशिक : पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी व्हावे, यासाठी प्रशासनाच्या मदतीने नाशिककरांनी सुरू केलेल्या 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेसाठीचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होत असून, त्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांना कलम ८० जी अन्वये करसवलत तसेच सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत मदत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नाशिककरांनी त्यासाठी सढळ हाताने मदत करावी आणि नाशिकच्या भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

भोसला मिलिटरी कॅम्पसच्या मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गीते यांच्यासह संस्था आणि औद्योगिक, बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

'जलसमृद्ध नाशिक' या अभियानातून गावागावात लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी जैन संघटनेसह इतर सेवाभावी, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक बांधकाम संघटनांचेही सहकार्य मिळणार आहे. सोमवारी गंगापूर धरणाजवळील गंगावरे गाव येथे सकाळी ८ वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार असून, यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी केले. भविष्यात बंगळुरू शहरासारखी पाणी समस्या नाशिकमध्ये भेडसावू नये, यासाठी आपण सर्वांच्या सहभागातून हे अभियान नक्कीच यशस्वी करू, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला. 

थेंबे थंबे तळे साचे...

एका दिवसात एका यंत्राने 20 तास काम केल्यास 10 लाख लिटर पाणीसाठा वाढण्यास मदत. प्रतिदिवशी होणार किमान 5 यंत्रांचा वापर. 60 दिवस चालणार काम. 30 कोटी लिटर पाणी साठवणूक करण्याइतका गाळ काढला जाणार. यामुळे धरणातील पाणीक्षमता 10 दलघफू इतकी वाढेल. यातून किमान एक दिवस शहराला पाणीपुरवठा होईल. इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल.

टॅग्स :शेतीनाशिकपाणीगंगापूर धरणनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय