Join us

Girna Dam : गिरणा धरणाचे दरवाजे कधीही उघडू शकतात, 31 ऑगस्टपर्यंत किती टक्के भरले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 20:35 IST

Girna Dam : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओसांडून वाहण्याच्या मार्गावर आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओसांडून वाहण्याच्या मार्गावर आहे. धरणात सध्या ९० टक्के साठा असल्याने मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणक्षेत्रातील पावसामुळे धरणात आवक होत असल्याने येत्या एक दोन दिवसात धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

मालेगाव तालुक्यासाठी बांधलेल्या या धरणाचा सर्वाधिक उपयोग जळगाव जिल्ह्यासाठी होत आहे. उत्तर महाराष्ट्राची संजीवनी असलेल्या या धरणात शनिवारी सकाळी ९० टक्के पाणी साठा झाल्याने हे धरण यंदाही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या परिस्थितीत आहे. सध्या धरणात गिरणा नदीच्या माध्यमातून पाण्याची आवक सुरू आहे. असे असले तरी अद्याप धरणाचे दरवाजे उघडलेले नसले तरी एक दोन दिवसात मात्र तशी शक्यता नाकारता येत नाही.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही धरण भरण्याच्या परिस्थितीत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला हे धरण भरले होते. त्यानंतर यंदा ते ऑगस्टच्या अखेरीस भरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. सध्या विविध धरणांतून वाहणारे पाणी व सुरू असलेला पाऊस यामुळे चालू वर्षाचा पाणीप्रश्न मिटला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

धरणाच्या ठळक घडामोडी

  • कामास सुरुवात : १९५५
  • धरणाचे उद्घाटन : १९६९
  • बांधकामासाठी लागलेला वेळ : १४ वर्ष
  • बांधकामासाठी खर्च : १३ कोटी
  • समुद्रसपाटीपासून उंची : १ हजार ३१८ इंच
  • दगडी बांधकाम : १ हजार ३०० फूट
  • मातीचे बांधकाम : १ हजार ७६० फूट

सलग चार वर्ष भरण्याचा विक्रमहे धरण आतापर्यंतच्या ५६ वर्षात फक्त १४ वेळा भरले असून, त्यात फक्त एकदाच लागोपाठ चार वर्ष भरले आहे. सन २०१९, २०२०, २०२१ व २०२२ अशी चार वर्ष धरण काठोकाठ भरले होते. त्यानंतर पुन्हा २०२४ व २०२५ या दोन वर्षात सलग भरले. त्यापूर्वी हे धरण २००४ व २००५ या दोन्ही वर्षी सलग भरले होते.

आत्तापर्यंत एकदाच जुलैमध्ये भरले धरण१९६९ पासून ते आतापर्यंत ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्येच भरले आहे. मात्र याला अपवाद २०२२ हे वर्ष ठरले होते. या २०२२ मध्ये तालुक्यासह कसमादेत सुरुवातीपासून पाऊस पडला होता. त्यामुळे जुलैच्या मध्यातच हे धरण पूर्णपणे भरले होते. त्यामुळे जुलैच्या अखेरीस धरणाचे मोठे वक्री दरवाजे उघडण्यात आले होते. हा एक विक्रम मानला जातो.

टॅग्स :गिरणा नदीधरणगंगापूर धरणशेती क्षेत्र